कर्मचाऱ्यांवर विश्‍वास ठेवा


तुम्ही स्वतःच्या कंपनीत किंवा दुसरीकडे एक बॉस म्हणून काम करीत असाल. तर तुमच्यावर महत्वाची जबाबदारी असते ती म्हणजे कर्मचाऱ्यांना समजून घेणे. तुम्ही जर तुमच्या कार्यालयात किंवा टीममध्ये चांगले वातावरण ठेवू इच्छित असाल तर प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या जबाबदाऱ्या योग्य तऱ्हेने वाटून द्या. प्रत्येक कर्मचाऱ्याला जर जबाबदार धरूनच संस्थेचा उत्कर्ष साधता येतो.

शिकण्याची संधी – तुमच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना जर तुम्ही जबाबदार करताना त्यांना काही सूट देणे ही आवश्‍यक असते. जसे की, एखादे काम करताना कर्मचाऱ्याने ते वेगळ्या पद्धतीने केले तर त्यासाठी त्याला असे प्रयोग करण्याची मुभा द्यावी. या प्रयोगांसाठी त्यांना योग्य सूट दिल्यास त्यांना शिकण्याची संधी आणि पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळते. या गोष्टीमुळे कर्मचारी कंपनीत मिळून मिसळून काम करतो.

संवाद कायम ठेवा – कार्यालयातील वरिष्ठांनी कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांसोबत एक बैठक करणे आवश्‍यक असते. कर्मचाऱ्यांनी सुचविलेल्या सर्व बाबी काळजीपूर्वक ऐकल्या पाहिजेत. या गोष्टीमुळे सर्व कर्मचाऱ्यांना असा संदेश मिळेल की, तुम्ही त्यांना योग्य महत्त्व देत आहात. कंपनीतील प्रत्येकाशी जर तुमचा संवाद नसेल तर ते कंपनीसाठीच धोक्‍याचे ठरते.

विश्‍वास ठेवा -तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यावर अविश्‍वास दाखवत असाल तर ती मोठी चूक ठरेल. प्रत्येक कर्मचाऱ्याला वरिष्ठांचा विश्‍वास मिळविण्यासाठी धडपड करावी लागते. हा विश्‍वास जर तुम्ही ठेवलात तर ते त्यांचे काम अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. परिणामी संस्थेचा, कंपनीचा फायदा होईल.

भीती दूर करा- जर तुमचे कर्मचारी दिलेले काम वेळेत पूर्ण करू शकत नसतील तर प्रथम त्यामागचे कारण जाणून घ्या. त्यांना योग्य शब्दांत समज देऊन कठोर शिक्षा देऊ नका. कामाच्या ठिकाणी अशा कठोर शिक्षा दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. असे वातावरण संस्थेच्या किंवा कंपनीच्या उत्कर्षासाठी धोक्‍याचे असते.

गैरसमज दूर करा – संस्थेअंतर्गत व्यवहारामध्ये स्पष्टता, पारदर्शीपणा ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येक निर्णय घेताना त्यात स्पष्टता असली पाहिजे. एकत्र काम करताना त्यातून निर्माण होणारे गैरसमज ताबडतोब दूर करावेत. यामुळे तुमच्या टीममधील वातावरण निकोप राहून कर्मचारी जास्त क्रिएटिव्ह पद्धतीने विचार करू शकतात याचा चांगला परिणाम कार्यपद्धतीवर होतो.

Leave a Comment