उद्धव ठाकरे सपत्नीक राज्यपालांच्या भेटीला


मुंबई: आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजभवनात भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे यादेखील उपस्थित होत्या. गुरुवारी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून शिवतीर्थावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

काल, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर राज्यातील सत्ताचक्र फिरले. दुपारी उपमुख्यमंत्री पदाचा अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर, त्यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपालांकडे राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीचा सत्ता स्थापण्याचा मार्ग मोकळा झाला. राज्यात गेल्या काही दिवसांच्या नाट्यमय घटनेनंतर अखेर मुख्यमंत्रिपदासाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा असलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी मिळवला आणि उद्धव ठाकरे यांची आगामी मुख्यमंत्री म्हणून एकमताने निवड केली. उद्या, गुरुवारी शिवतीर्थावर उद्धव हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या रूपाने महाराष्ट्राला मिळणार आहे.

बैठक मंगळवारी संध्याकाळी हॉटेल ट्रायडंटमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व आमदारांची एक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीचे नेते म्हणून तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी अनुमोदन दिले. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या सर्व आमदारांनी या ठरावाला एकमताने अनुमोदन दिले. यावेळी तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले.

Leave a Comment