आता तृप्ती देसाई देखील म्हणतात ; मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन !


कोची – भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई शबरीमला मंदिरात प्रवेशाचा निर्धार करून कोचीत दाखल झाल्या होत्या, पण त्यांना सुरक्षेच्या अभावी माघारी परतावे लागले. देसाई यांनी सुरक्षा देण्यास केरळ पोलिसांनी नकार दिल्यामुळे देसाई यांनी ३ तासांच्या प्रतीक्षेनंतर आपल्या महिला कार्यकर्त्यांसह मागे परतण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान, त्यांनी शबरीमलाला मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन असे बोलून दाखवले.

काल (मंगळवार) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यांनी कोचिन विमानतळावरून थेट कोची पोलीस आयुक्तालय गाठत सुरक्षेची मागणी केली होती. भाजप आणि शबरीमलाच्या भक्तांनी तेव्हा तृप्ती देसाई यांच्याविरोधात आंदोलन केल्यामुळे देसाई यांना सुरक्षा देण्यास पोलिसांनी नकार दिला. भक्तांनी पोलीस आयुक्तालयासमोर देसाई यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी परिसरात तणाव निर्माण झाला होता.

तृप्ती देसाई याविषयी बोलताना म्हणाल्या, आम्हाला संविधान दिनाच्या दिवशी न्याय मिळाला नाही. आम्हाला सुरक्षा देण्यास पोलिसांनी नकार दिला. उलट शबरीमलाला जाऊ, नये असा पोलिसांनीच सल्ला दिल्यामुळे आम्ही माघारी जात आहोत. दरम्यान, शबरीमला दर्शनासाठी तृप्ती देसाई यांनी ऑनलाईन बुकिंग केले होते. बुकिंग केलेला ई-मेल त्यांनी मुख्यमंत्री आणि डीजीपींना पाठवला होता. पण, केरळ सरकारसह पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवली नाही.

Leave a Comment