गायीच्या दुधाचा धोका


आपल्या देशात गायीला फार पवित्र वगैरे मानले जाते. आपल्या परंपरेने गायीला देवाचाही दर्जा दिला आहे. त्यामुळे गायीच्या दुधात काही दोष असेल आणि त्याचे काही वाईटही परिणाम असतील याचा आपण विचारही करू़ शकत नाही पण ही वस्तुस्थिती आहे. विशेषत: लहान मुलांना गायीचे दूध पाजणे हे आपण फारच आरोग्यदायी मानण्याकडे आपला कल असतो. पण आता तज्ञांनी गायीच्या दुधाबाबत इशारा दिला आहे. एक वर्षाच्या आतील बालकांना गायीचे दूध पाजणे हे हानीकारक असल्याचे आता तज्ञांनी म्हटले आहे. काही कारणांनी लहान बालकाला आईचे दूध मिळत नसले तर त्याला आईच्या दुधाला पर्याय म्हणून गायीचे दूध पाजले जात असते. यातून काही धोका उद्भवणे शक्यच नाही असे आपण समजतो पण एक वर्षाच्या आतील बालकाला गायीचे दूध पाजल्यास त्याला ऍलर्जीसारखे विकार होण्याची शक्यता असते.

लहान बालकाचा सहा महिन्यापर्यंतचा संपूर्ण आहार हा आईचे दूध हाच असतो. सहा महिन्यानंतर त्याला काही हलके अन्न देण्यास हरकत नाही पण सहा महिने त्याला आईच्या दुधातून जे हवे ते सगळे मिळते. त्याला त्याशिवाय वरचे पाणीसुद्धा पाजणे योग्य नाही असे आता दिसून आले आहे. याचा अर्थ असा की त्याला जे काही हवे असते ते त्याच्या आईच्या दुधात असते. पण त्याऐवजी बालकाला गायीचे दूध पाजले तर त्या दुधातील अधिक प्रथिने त्याला पचत नाहीत. त्याच्या पचनसंस्थेवर आणि मूत्रपिंडावर या प्रथिनांचे दुष्परिणात होतात. त्यातल्या त्यात त्याला ऍलर्जीच्या स्वरूपातील श्‍वसन प्रक्रियेतील आजार होतात. त्याला ते गायीचे दूध पचतही नाही.

एक वर्षानंतर त्याला गायीचे दूध पाजायला काही हरकत नाही असे मानले जात असले तरीही याही अवस्थेत ते दूध बालकांना चांगले तापवून पाजले पाहिजे. वर्षाच्या आतील मुलांना गायीचे दूध पाजण्याशिवाय काही इलाजच नाही असे लक्षात येत असेल तर ते न पाजता त्यांना पोषण द्रव्यांसाठी विशेष हायड्रोलाइज्ड आणि अमिनो ऍसिड आधारित अन्न दिले पाहिजे. या अन्नात बालकांना कोणताही आजार होण्याची शक्यता नसते. गायीच्या दुधात आयर्न म्हणजे लोहाचे प्रमाण कमी असते. आपण मात्र गायीच्या दुधातून बालकाला जे हवे ते सारे मिळत असणारच असा विश्‍वास बाळगून असतो पण लोह कमी असल्याने बालकाला अशक्तपणा येण्याची शक्यता असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment