सर्वसामान्यांचा रेल्वे प्रवास महागणार; भाडेवाढीला पीएमओची मंजुरी


नवी दिल्ली – रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे. कारण भारतीय रेल्वे विभागाने प्रवासी भाड्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) बुधवारीच या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी देत भाडेवाढीचा मार्ग खुला केला. यानंतर लवकरच नवी भाडे कशी असेल याची औपचारिक माहिती भारतीय रेल्वे विभागाकडून जाहीर केली जाणार आहे.

यासंदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार भाडेवाढ करण्यासाठी एक नवीन धोरण भारतीय रेल्वे तयार करत असून पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी मिळाल्यानंतर नवीन धोरण नोव्हेंबर महिन्याच्या शेवटीच तयार केले जाणार आहे. नवीन भाडेवाढ यामध्येच लागू केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर ही भाडेवाढ रेल्वे का करत आहे, यासंदर्भात लोकांना सकारात्मक संदेश देण्यासाठी एक मोहिम देखील राबविली जाणार आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेत मंदी असल्याचे कितीही नाकारले तरीही याचा फटका रेल्वेला बसला आहे. रेल्वेला या मंदीमुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. सोबतच, रेल्वेला निर्धारित केलेला महसूल गोळा करण्यातही अपयश येत आहे. इतर कारणांपैकीच एक महत्वाचे कारण म्हणून यात चांगल्या रस्त्यांना दोष दिला जात आहे. महामार्ग आणि रस्ते चांगले झाल्याने रेल्वे प्रवास कमी झाला असाही तर्क दिला जात आहे. त्याचबरोबर दोष आरोपांच्या यादीमध्ये विमानसेवेला देखील दोष दिले जात आहे. अनेकांनी रेल्वेकडे विमान सेवा कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या चांगल्या ऑफर्समुळे पाठ फिरवली असे सांगितले जात आहे. आता रेल्वे आपल्या ग्राहकांना या सर्वच कारणांचा तपशील सांगण्याच्या तयारीत आहे.

Leave a Comment