चक्क सांडपाणी रिसायकल्ड करून बनविण्यात आली बिअर

तुम्ही सांडपाणी रिसायकल करून बनविण्यात आलेली ड्रिंक पिवू शकता का कदाचित तुमचे उत्तर असेल, नाही. मात्र ते ड्रिंक बिअर असेल तर ? स्वीडनच्या तज्ञांनी सांडपाणी रिसायकल्ड करून बिअर तयार केली आहे. आयव्हीएल स्वीडिश एन्वायरमेंटल रिसर्च इंस्टिट्यूटने बिअर तयार करणारी कंपनी कार्ल्सबर्ग आणि न्यू कार्नेगी ब्रेवरी यांच्यासोबत मिळून ही बिअर तयार केली आहे.

त्यांचे म्हणणे आहे की, सर्वसामान्य लोकांच्या मनात रिसायकल्ड पाण्याच्या बाबतीत अनेक प्रश्न आणि भ्रम असतात. हे भ्रम दूर करण्यासाठी ही बिअर तयार करण्यात आली आहे. PU:REST नावाने तयार करण्यात आलेली बिअर लोकप्रिय ठरत असून, आतापर्यंत 6 हजार लीटर बिअरची विक्री झाली आहे.

आयव्हीएलच्या सदस्य रूपाली देशमूख यांनी सांगितले की, रिसायकल्ड पाणी हे एकदम स्वच्छ असते. त्यामध्ये आम्ही मीठ टाकतो. त्या म्हणाल्या की, आमची संस्था अल्कोहॉल विकायचे काम करत नाही, तर लोकांना रिसायकल्ड पाणी पिण्यायोग्य आहे हे पटवून देण्यासाठी हे करण्यात आले आहे.