उद्याच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता


मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची, तर काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते जयंत पाटील हे दोघेही उपमुख्यमंत्रिदाची उद्याच शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज सायंकाळी सहा वाजता संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात येणार असून ही घोषणा त्यात करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

अजित पवार यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्तास्थापन्याबाबतची चर्चा सुरू असतानाच भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे महाविकास आघाडीच्या तंबूत खळबळ उडाली होती. पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनीही आपआपल्या पदांचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा चर्चेचे गुऱ्हाळ न घालता आघाडीमध्ये आजच राज्यपालांना भेटून उद्या सकाळी शपथ घेण्याचे घटत असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाला आघाडीने पसंती दिली असून मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास उद्धव यांनीही होकार दर्शविल्याचे सूत्रांकडून कळत आहे.

उद्या उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीकडून जयंत पाटील हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी पुन्हा अजित पवारांचा विचार होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत असून जितेंद्र आव्हाड यांचे नावही या पदासाठी चर्चेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, संसदीय कामकाजाचा अनुभव उद्धव ठाकरे यांना नसल्याने अनुभवी नेते म्हणून जयंत पाटील यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद द्यावे, अशी राष्ट्रवादीत चर्चा आहे. १०५ आमदार भाजपकडे असून त्यातील अनेक आमदार अनेक वर्षांपासून विधानसभेचे सदस्य आहेत. त्यापैकी अनेकजण फर्डे वक्ते आणि अभ्यासू आहेत. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील विरोधकांचा यशस्वी सामना करू शकतील, असा राष्ट्रवादीच्या एका गटाचा सूर आहे.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असून ते पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील, असे स्पष्ट केले. आपल्या पदाचा अजित पवार यांनी राजीनामा दिला असून ते आमच्या सोबतच आहेत. आमचा संपर्कही त्यांच्याशी झाला असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

Leave a Comment