या भगतसिंहांने रात्रीच्या अंधारात लोकशाही व स्वातंत्र्यास वधस्तंभावर चढवले


मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे फुटीर नेते अजित पवार यांनी दिलेल्या बनावट पत्राच्या आधारे त्यांना थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर कडाडून टीका केली आहे. देशासाठी एक भगतसिंह फासावर गेला, तर या दुसऱ्या भगतसिंहांनी रात्रीच्या अंधारात सही-शिक्क्याने लोकशाही व स्वातंत्र्यास वधस्तंभावर चढवल्याचा घणाघात केला आहे.

सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राज्यपाल कोश्यारी यांच्यावर ‘सामना’च्या अग्रलेखातून उद्धव यांनी जोरदार टीका केली आहे. राजभवनात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीने १६२ आमदारांचे पत्र सादर केले असून हे सर्व आमदार राज्यपालांसमोर कधीही उभे राहायला तयार आहेत. एवढे चित्र स्पष्ट असताना कोणत्या बहुमताच्या आधारावर राज्यपालांनी फडणवीस यांना शपथ दिली, असा प्रश्न उद्धव यांनी अग्रलेखाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. अजित पवारांवरही उद्धव यांनी टीका केली आहे. सत्याचा विजय होणारच आहे. काळजी नसावी, असे देखील उद्धव यांनी अग्रलेखात म्हटले आहे.

उद्धव ठाकरे पुढे म्हणतात, की सत्तांधाऱ्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा व प्रतिष्ठेचा बाजार मांडला असून ज्यांचे महाराष्ट्राशी भावनिक नाते नाही तेच हे अशी लक्तरे काढू शकतात. जे काही महाराष्ट्रात घडले त्यात कसलीही चाणक्य-चतुराई किंवा ‘कोश्यारीसाहेबांची होशियारी’ नाही. आमदारांचे अपहण करून त्यांना दुसऱ्या राज्यांत डांबून ठेवणे यात कसली आली आहे चाणक्य नीती?

अजित पवार शरद पवारांचे पुतणे म्हणून मिरवत असतील तर आधी त्यांनी बारामतीच्या आमदारकीचा राजीनामा देऊन स्वत:चे राजकारण करायला हवे होते. पण जे काकांनी कमावले तेच चोरून ‘मीच नेता, माझाच पक्ष’ असे सांगणे हा म्हणजे वेडेपणाचा कळस आहे. कालपर्यंत अजित पवार खोट बोलत नाही असं सांगणारे हेच अजित पवार आता रोज खोट बोलत आहेत. मुळात त्यांनी राज्यपालांनाच खोटे पत्र दिले आहे. कोणीही सत्तास्थापना करावी. पण लोकशाही संस्थावरील लोकांचा विश्वासच उडून जावा एवढ्या खालच्या थराला जाऊ नये.

भाजपकडे बहुमत होते तर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी नव्या चांडाळ चौकडीची ‘ऑपरेशन लोटस’च्या नावाखाली नियुक्ती का केली? ही चौकडी पैशाच्या बॅगा घेऊन फिरत आहे. हे थैलीशाहीचे राजकारण असून संघाचे स्वयंसेवक म्हणवणाऱ्यांवर ही वेळ का यावी? आमचा गडकरी हे एक शहाणे राजकारणी आहेत असा समज होता. तोही गैरसमज ठरला. त्यांनी या सर्व प्रकारास क्रिकेटच्या खेळाची उपमा दिली. पण कितीही फिक्सिंग झाले तरी ‘सत्यमेव जयते’चा पराभव होणार नाही.

Leave a Comment