डिप्रेशनला करा ‘बाय-बाय’


आजकालच्या यांत्रिक युगामध्ये काळाबरोबर धावताना आपल्याला स्वतः बद्दल विचार करायला सवडच नसते. कामाच्या धकाधकीत आणि डेडलाईन्स ची गुंतागुंत सांभाळताना आपण स्वतःला विसरून जातो. आणि मग एक दिवस असा येतो, जेव्हा ही धावपळ नकोशी होते, कुठल्याच कामात रस वाटेनासा होतो, परिवारामध्ये, मित्रमैत्रिणींच्या सहवासातही मन रमत नाही, सतत कुठल्या तरी अनामिक काळजीने मन ग्रासलेले असते. हीच सुरुवात असते डिप्रेशनची. जागतिक आरोग्य दिनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सादर केलेल्या रिपोर्ट मध्ये म्हटले आहे, की मागील एका दशकामध्ये डिप्रेशनने ग्रासलेल्या व्यक्तींच्या संख्येमध्ये तब्बल अठरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यात विशेष असे की संपूर्ण जगामध्ये डिप्रेशनने ग्रस्त असलेल्या व्यक्तींमध्ये पंचवीस टक्के व्यक्ती भारतीय आहेत, इतकेच नव्हे तर ह्यातील बहुतेक व्यक्ती किशोरवयीन आहेत. डिप्रेशनची लक्षणे नेमकी कोणती आणि डिप्रेशनपासून आपण स्वतः ला कसे दूर ठेऊ शकतो या बद्दल थोडेसे.

एखाद्या व्यक्तीच्या वागण्याबोलण्या मध्ये अचानक जाणवू लागलेले लहानलहान बदल , ती व्यक्ती डिप्रेशनने ग्रस्त असल्याचे दर्शवितात. ही लक्षणे वेळीच ओळखून त्या व्यक्तीची योग्य ती मदत करून तिला डिप्रेशनमधून बाहेर काढणे शक्य असते. व्यवस्थित झोप न लागणे, भूक अचानक कमी होणे, स्वतःला सतत कुठल्या ना कुठल्या कारणासाठी दोष देत राहणे, सतत उदास मनस्थितीत असणे, आत्मविश्वास दुर्बल होणे, मादक पदार्थांच्या सेवनाच्या आहारी जाणे, एकाग्रता कमी होणे, स्वतःचे जीवन निरर्थक आहे असे वाटून ते संपविण्याबद्दल विचार करत राहणे, कुठल्याही कामामध्ये रस नसणे, ही सर्व डिप्रेशनची प्रमुख लक्षणे आहेत.

आपल्या आसपासची किंवा ओळखीची व्यक्ती डिप्रेशनने ग्रस्त असल्यास त्यांना त्याबद्दल मनमोकळेपणाने बोलण्यास प्रवृत्त करावे. सुरुवातीला अश्या व्यक्ती काहीही बोलण्याचे टाळतात, पण त्यांच्याशी सहानुभूतीने बोलायचा प्रयत्न करीत राहावे. डिप्रेशनने ग्रस्त असललेल्या व्यक्ती मुळातच आपल्याला डिप्रेशन आहे हे मान्य करीत नाहीत. त्यामुळे संयम ठेऊन, त्यांच्याशी बोलत राहून त्यांच्या डिप्रेशन मागचे नेमके कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या आयुष्यातील समस्यांना कुठल्याही प्रकारे कमी न लेखता, त्या समस्यांमधून कसा मार्ग काढता येईल यावर चर्चा करावी.

योग्य व्यायाम आणि संतुलित आहार हा प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहे. विशेषकरून डिप्रेशनने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी आहार आणि व्यायामाचे योग्य संतुलन राखावयास हवे. व्यायामेमुळे मन स्थिर आणि एकाग्र राहण्यास मदत मिळून त्यामुळे शरीरामध्ये सकारात्मक उर्जेचा संचार होतो. डिप्रेशनने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी आपल्या मनातील विचार एखाद्या डायरीमध्ये लिहावेत. लिखाण हे मानसिक तणाव कमी करण्याचे प्रभावी माध्यम आहे. याशिवाय आपण केलेले लिखाण वाचताना डिप्रेस्ड व्यक्ती स्वतःच्याही नकळत आत्मपरीक्षण करू लागते. आपल्या मनातील विचारांचे विश्लेषण करण्याचीही संधी अश्या वेळी मिळते. कॉम्पुटर वर ब्लॉग्स लिहिणे हा ही डायरी लिखाणासाठी उत्तम पर्याय आहे.

डिप्रेस्ड व्यक्तींनी आपल्या मित्रपरिवाराच्या सहवासात राहून, नकारात्मक दृष्टीकोन असणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहावयास हवे. नकारात्मक दृष्टीकोन असणाऱ्या व्यक्ती इतरांचे मनोबल खच्ची करत असतात, त्यामुळे अश्या व्यक्तींपासून दूर राहावे. आपल्या कॉलेजमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी जर एकादी व्यक्ती सतत मानसिक ताणाखाली असेल, तर त्यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. कामाच्या डेडलाईन्स मुळे, म्हणजेच काम वेळेवर पूर्ण होत नसल्याने जर स्ट्रेस जाणवत असेल, तर आपल्या वेळेचे योग्य नियोजन करून, आपल्यावर सोपविलेले काम कसे पूर्ण करता येईल याचा आरखडा तयार करावा. गरज पडल्यास आपल्या मित्रपरिवाराची मदत घ्यावी.

अभ्यासातून किंवा कामातून सुट्टी गरजेची असते. सततचे अभ्यासाचे टेन्शन किंवा कामाचा ताण डिप्रेशन ला कारणीभूत होऊ शकतो. त्यामुळे वेळोवेळी सुट्टी गरजेची असते. यामुळे आपले मन प्रसन्न राहते, ‘रिचार्ज’ होते. त्यामुळे सुट्टीनंतर कामाला किंवा अभ्यासाला नव्या जोमाने सुरुवात करता येते. त्याचप्रमाणे रात्रीची आठ तासांची शांत झोप, मन शांत करण्यास आवश्यक आहे. झोप लागत नसल्यास आपल्या आवडीचे एखादे पुस्तक वाचावे किंवा आपली मनपसंत गाणी ऐकावीत. त्यामुळे मन शांत होण्यास मदत मिळून स्वस्थ झोप लागेल.

भूतकाळात घडून गेलेल्या घटना आठवून उदास होणेही डिप्रेशनला कारणीभूत ठरू शकते. जे होऊन गेले त्याचा विचार न करीत बसता, जे व्हायचे आहे ते उत्तम प्रकारे कसे पार पाडता येईल त्याबद्दल विचार करायला हवा. अश्या वेळी आपल्या परिवारातील आप्तेष्ट आणि मित्रमंडळी यांच्या सहवासात जास्त वेळ घालवावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही