कालिदास कोळंबकर यांनी विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती


मुंबई: भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकतीच राजभवनात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात, के. सी. पाडवी आणि भाजप आमदार कालिदास कोळंबकर या विधानसभेच्या तीन ज्येष्ठ सदस्यांची नावे विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी विधानसभा सचिवांकडे आली होती. त्यापैकी कालिदास कोळंबकर यांची ज्येष्ठ सदस्य म्हणून विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ घेण्यासाठी राजभवनात आल्याचे कोळंबकर यांनी सांगितले.

सलग आठवेळा आमदार म्हणून कोळंबकर हे निवडून आले आहेत. वडाळा विधानसभा मतदारसंघातून ते सात वेळा निवडून आले आहेत. कट्टर शिवसैनिक ते भाजपचे नेते अशी ओळख असलेले कोळंबकर सभागृहाचे कामकाज कसे चालवतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्रिपदाची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर विधानसभेत त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यावेळी माजी शिवसैनिक असलेले विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कोळंबकर हे उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करताना अडचणीत आणतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment