
मुंबई- भाजपला आज सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला असून न्यायालयाने भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी उद्या (27 नोव्हेंबर) सध्याकाळी 5 वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. यादरम्यान, मुंबईतील जे. डब्ल्यू. मॅरिएटमध्ये उद्याची रणनिती ठरवण्यासाठी काँग्रेस आमदारांची बैठक होत आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते मलिकार्जुन खर्गे यावेळी आमदारांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी यावेळी महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड केली आहे. याधी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपल्या गटनेत्याची निवड केली होती, पण काँग्रेसने आज आपला गटनेता निवडला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड
सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा तिढा सोडवताना भाजपला जोरदार दणका दिला आहे. उद्याच बहुमत चाचणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रामना, अशोक भूषण आणि संजीव खन्ना यांनी दिल्यामुळे, फडणवीस सरकारला 27 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. तसेच, यात कोणतेही गुप्त मतदान होणार नाही, सर्व निकालाचे लाईव्ह टेलिकास्ट केले जाईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
