राज्यातील सत्तासंघर्षामुळे पोलिसांची दमछाक


मुंबई – महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या सत्तासंघर्षामुळे मुंबई पोलिसांची पुरती दमछाक झाली आहे. आर्थिक राजधानी मुंबई सध्या राजकीय आखाडा बनला असल्यामुळे शहराच्या कानाकोपऱ्यातील हालचालींनुसार त्या-त्या ठिकाणी पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागत आहे. मुंबई हल्ल्याला उद्या ११ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे पोलिसांवर त्यासाठीच्या सतर्कतेची जबाबदारीही आहे. त्यानंतर ६ डिसेंबरला बाबरी मशिद पाडल्याचा दिवस व महापरिनिर्वाण दिनासाठीही पोलीस दलाला सज्ज राहावे लागणार आहे.

विधानसभा निवडणुकांनंतर त्या निवडणुकीचा निकाल त्यापाठोपाठ दिवाळीचा सण आणि त्यानंतर भाजपच्या सत्तास्थापनेनंतर निर्माण झालेला संघर्ष अशा महिनाभराच्या घटनाक्रमात विशेषत: मुंबई पोलिसांची शारीरिक व मानसिक ओढाताण सुरू आहे. मुंबईत झेड, झेड प्लस सुरक्षा असलेले राज्यातील सर्व व दिल्लीतीलही काही नेते एकवटले आहेत. या नेत्यांच्या भल्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत मुंबईभर भेटीगाठी सुरू आहेत. रस्त्यावर त्यांच्या मोटारींचा ताफा उतरताच पोलिसांनाही नाक्या-नाक्यावर सज्ज राहावे लागत आहे. त्यांच्या भेटींच्या तसेच मुक्कामाच्या ठिकाणी अतिरिक्त कर्मचारी तैनात ठेवावे लागत आहेत. त्याचबरोबर मातोश्री, वर्षा निवासस्थान, सह्याद्री अतिथिगृह, सिल्व्हर ओक, राजभवन, शिवसेना भवन तसेच असंख्य नेत्यांची निवासस्थाने आणि पक्षीय कार्यालये याठिकाणी कार्यकर्ते आणि नेत्यांच्या बैठकांचा रतीब सुरू आहे. पोलिसांना तेथेही दक्ष राहावे लागते. सध्या मुंबईत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या सर्वच पक्षांचे आमदार दाखल झाले असून मुंबईतील वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्त तेथे देखील ठेवण्यात आला आहे.

Leave a Comment