महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राजभवनात सादर केले १६० आमदारांच्या सह्यांचे पत्र


मुंबई – राज्यातील सत्तासंघर्ष अद्यापही कायम असून शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी आमदारांच्या सह्यांचे पत्र पळवल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. पण राष्ट्रवादीच्या आमदारांसह अन्य २ पक्षांच्या आमदारांच्या सह्या घेऊन आता महाविकासआघाडीचे नेते राजभवनात पोहोचले आहेत. हे पत्र राजभवनातील अधिकाऱ्यांकडे त्यांनी सादर केले आहे. या पत्रावर १६० आमदारांच्या सह्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

बहुमत नसतानाही राज्यात भाजपने सत्ता स्थापन केल्याचा आरोप महाविकासआघाडीचे नेते करीत आहेत. लवकरात लवकर भाजपने बहुमत सिद्ध करावे, या मागणीसाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आज त्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच न्यायालयाने जर बहुमत सिद्ध करण्यास सांगितले तर भाजप कशाप्रकारे बहुमत सिद्ध करेल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment