हनिमूनला जाणाऱ्या सीएला घातला ऑनलाईन गंडा


मुंबई – सध्याच्या या डिजीटल युगात ऑनलाईन फसवणूकीची अनेक प्रकरणे आपल्या समोर आली आहेत. असे असताना देखील आपल्यापैकी अनेकांना ऑनलाईन कामे करण्याचा मोह आवरता येत नाही. पण त्यामुळे आपलेच नुकसान होत आहे. असाच काहीसा प्रकार मुंबईतील एका सीएसोबत घडला आहे. या महाशयांनी हनिमूनसाठी युरोप हे ठिकाण निवडले होते. त्यासाठी या ठिकाणाचे बुकिंग करणाऱ्या या सीएला दोन भामट्यांनी ऑनलाईन दोन लाखांचा गंडा घातला आहे. दिंडोशी पोलिसांनी याप्रकरणी सीएच्या तक्रारीवरून दाखल केला आहे.

गोरेगाव येथील रहिवाशी असलेल्या या सीएचे जून महिन्यात लग्न झाले होते. त्यानंतर त्याला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हनिमूनसाठी युरोपला जायचे होते. त्याने यासाठी गुगलच्या माध्यमातून टूर्स अँड ट्रॅव्हल्स पॅकेज देणाऱ्या कंपन्यांचा शोध घेतला. त्याने एका कंपनीच्या क्रमांकावर संपर्क केला. आठ दिवस आणि सात रात्रींचे या कंपनीच्या प्रतिनिधीने दिलेले पॅकेज परवडल्याने सीएने यासाठी होकार दिला. तिकीट बुकिंग, हॉटेल बुकिंग आणि व्हिसा यासाठी अॅडव्हान्स द्यावे लागतील, असे कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले. त्या प्रतिनिधीने दिलेल्या बँक खात्यांवर त्यानुसार सीएने दोन लाख दोन हजार रुपये ट्रान्सफर केले. पण त्या प्रतिनिधीने यानंतर मोबाइल बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या सीएने दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Leave a Comment