तलाठी -ग्रामव्यवस्थेचा महत्त्वाचा दुवा

बारा बलुतेदार असलेली ग्रामव्यवस्था आता कधीच इतिहासजमा झाली आहे. अनुशासनाच्या सोयीसाठी राज्य सरकारने आता ग्रामीण भागासाठी सुयोग्य व्यवस्था केली असून तलाठी हा या व्यवस्थेचा एक महत्त्वाचा दुवा आहे असे म्हणता येईल.   

तलाठी आणि त्याची नक्की कामे कोणती या विषयी बरेच समज गैरसमज असतात. राज्याच्या महसूल विभागातील सर्वात कनिष्ठ पद म्हणजे तलाठी असे सोप्या भाषेत सांगता येते. राज्याच्या महसूल विभागातील कामांची वर्गवारीही केलेली असते व त्यातील जमिनीसंदर्भातील जे महसूल असतात किवा नोंदी बदल असतात ते ग्रामपातळीवर नोंदविण्याचा अधिकार या तलाठ्यांना असतो.

आजच्या व्यवस्थेप्रमाणे एखाद्या तालुक्यात जितकी गांवे असतील त्यातील प्रत्येक गावात तलाठी असतोच. पूर्वीच्या काळी तलाठ्यांची नेमणूक जिल्हाधिकारीच करत असत. मात्र आता ही नेमणूक परिक्षा घेऊन त्यातून केली जाते. महाराष्ट्र  लोकसेवा आयोगाच्या वतीने या परिक्षा साधारणपणे जुलै महिन्यात घेतल्या जातात.त्यांच्या जाहिरातीही वर्तमानपत्रातून दिल्या जातात.

 तलाठी हा मुळात ग्रामीण भागात काम करणार असतो व त्यामुळे त्याची नाळ ग्रामीण जीवनाशी जुळणारी असावी अशी अपेक्षा असते. त्यादृष्टीने पूर्वी ग्रामीण भागातील युवकांनाच तलाठी म्हणून नेमले जात असे. दहावी अथवा बारावीची परीक्षा पास असणे इतकेच क्वालिफिकेशन त्यासाठी होते. मात्र आता किमान पदवीधर असे क्वालिफिकेशन त्यासाठी आवश्यक आहे.

 संख्या आणि संधी कमी असूनही आजही अनेक कारणांनी सरकारी नोकर्‍यांचे ग्लॅमर कायम आहे. तलाठी ही अशीच एक ग्लॅमर असलेली जागा. त्यामुळेच आजही तलाठी परिक्षा जाहीर झाल्या की अगदी १० जागांसाठी हजारोंच्या संख्येने अर्ज येतात. तलाठी म्हणजे ग्रामीण भागातला कलेक्टरच अशी ग्रामीण जनतेची भावना असते. कारण जमिनीच्या रूपातील मालमत्ता, स्थावर यांच्या अधिकृत सरकारी नोंदी व व्यवहार वैधता सांभाळणे हे तलाठ्याचे काम. मग एखाद्याच्या जमिनीचा सातबारा उतारा काढण्यासाठी नोंदी करावयाच्या असोत की शेतसारा गोळा करणे असो, ते तलाठ्याच्याच हातात.तलाठ्याने केलेली नोंद ही अंतिम मानली जाते. अर्थात जमिनीवरील नांवे बदल वगैरेसारखी कामे असतील तर तलाठी त्यांच्या नोंदी करतो पण त्या नोंदीनुसार पुढील कारवाई करण्याचा अधिकार मात्र तलाठ्याला नसतो. तलाठ्याने या नोंदी करून सर्कल अधिकारी किवा तहसीलदारांकडे पाठवायच्या असतात व तेथून अंतिम काम केले जाते.

आजच्या व्यवस्थेत चार-पाच-सहा गांवे मिळून एक सर्कल ऑफिसर असतो व गावांच्या संख्येनुसार  तालुकयात असे अनेक सर्कल असतात. तालुक्याचा सगळा कारभार असतो तहसीलदार किवा मामलेदारांच्या हातात.

तलाठी या पदासाठी इतक्या मोठ्या संख्येने जे अर्ज येतात त्याची कारणे अनेक असली तरी राज्याचे महसूल खाते म्हणजे भ्रष्टाचाराचे आगारच असते असे नाईलाजाने म्हणावे लागते आणि तलाठीही त्याला अपवाद नसतात. कामे करून देण्यासाठी पैसे मागणे हा इथला उपचारच असतो. त्यामुळेच आज वर्तमानपत्रातून दररोज एक तरी बातमी तलाठ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले अशी असतेच.

 राज्याच्या विविध भागात तलाठी भाऊसाहेब,पटवारी किवा पांडेबुवा या नांवानेही ओळखले जातात. गावच्या मुलकी कारभार्‍याची ही नोकरी तृतीय श्रेणीची असली तरी प्रतिष्ठेची असते. गावच्या कारभारात या पदाचे स्थान महत्त्वाचे असते. तलाठ्याचा अभिप्राय केवळ महत्त्वाचा नसतो तर तो अंतिमही असतो व त्यामुळे वरकमाईची संधीही अधिक असते. अर्थात ही नोकरी बदलीची असल्याने तलाठ्यांच्याही नियमाप्रमाणे बदल्या केल्या जातात.

Leave a Comment