शिवसेनेचा ‘पोपट’ होणार, प्रकाश आंबेडकरांनी वर्तवले होते भाकित


अकोला – राज्यातील राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला असून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शपथ घेतली. यावर राज्यात रातोरात सरकार स्थापन झाल्याने आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नसून नाही. याबाबत मी शिवसेनेचा पोपट व्हायला नको, असे म्हणालो होतो आणि शेवटी तसेच झाले, राजकारणात सतर्क राहण्याची गरज असल्याचा टोला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेला लगावला आहे.

आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, की राज्यपालांनी ज्या पद्धतीने शपथ दिली, ती घटनेला धरून नसून याबाबत राज्यपालांनी कल्पना द्यायला हवी होती, की शपथ विधीचा कार्यक्रम होत आहे. त्यांनी सकाळी सकाळीच कार्यक्रम पार पाडला. या ठिकाणी कुठेतरी लोकांना विश्वासात न घेण्याचा कारभार झाला असल्याचे मी मानतो.

दुसरे, हे अचानक घडले असेल, असे मानायला मी तयार नाही. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी भेट घेतली. त्यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भेट झाली असल्याचे सांगण्यात आले. पण 2 दिवस आधीच राज्यपालांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केली. वास तिथूनच यायला लागला. म्हणून उद्धव ठाकरे यांना इशारा देण्याचे कामकाज केले की आपला पोपट होवू देऊ नका. दुर्दैव आहे की राजकारणाची मंडळी जेवढी सतर्क पाहिजे तेवढी सतर्क नाही, म्हणून फसले जातात, अशी परिस्थिती आहे, असे आंबेडकरांनी सांगितले.

Leave a Comment