पहिल्या वहिल्या ऐतिहासिक मार्व्हल कॉमिकची इतक्या कोटींना झाली विक्री

स्पायडर मॅन, एक्स मॅन आणि द एव्हेंजर्स सारख्या सुपर हिरोंना जन्म देणाऱ्या पहिल्या वहिल्या मार्व्हल कॉमिकचा अमेरिकेत लिलाव करण्यात आला आहे.  या कॉमिकसाठी लिलावात तब्बल 1.26 मिलियन डॉलरची (जवळपास 9 कोटी 4 लाख) बोली लागली.

हेरिटेज लिलावाचे वरिष्ठ व्हाईस प्रेसिडेंट एड जस्टेर म्हणाले की, ही एक ऐतिहासिक कॉमिकची ऐतिहासिक प्रत आहे. हे कॉमिक 1939 मध्ये टाइमली कॉमिक्सतर्फे प्रकाशित करण्यात आले होते, जे नंतर मार्व्हल झाले.

स्क्रिनरायटर स्टॅन ली यांच्या मार्गदर्शनाखाली 1960 च्या दशकात अनेक सुपरहिरो तयार करण्यात आले. याच कॉमिक्स आणि सुपरहिरोंवर आधारित चित्रपटांनी जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

1939 मध्ये मार्व्हल कॉमिक्सची पहिली कॉपी 10 सेंटला विकली गेली होती. 2011 मध्ये ज्या कॉमिकमधून स्पायडर मॅन सर्वात प्रथम चाहत्यांच्या भेटीला आला होता, त्या अमेझिंग फॅन्टसी #15 या कॉमिकची 1.1 मिलियन डॉलरला विक्री करण्यात आली होती.

2014 मध्ये देखील 1938 मध्ये प्रकाशित झालेल्या अक्शन कॉमिकसाठी 3.2 मिलियन डॉलरची बोली लागली होती. या कॉमिकद्वारे सुपरमॅनने पदार्पण केले. मार्व्हल कॉमिकसाठी लागलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी बोली आहे.

Leave a Comment