महाराष्ट्रात परत फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री

महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना आज सकाळी पहायला मिळाली. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 9 नोव्हेंबरला लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट सकाळी 5 वाजून 47 मिनिटांनी हटवण्यात आले. त्यानंतर सकाळी 8.15 वाजता फडणवीस आणि पवार यांनी शपथ घेतली.

गेली अनेक दिवसांपासून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये सत्ता स्थापनेवरून चर्चा सुरू होत्या. मात्र एकही पक्ष सत्ता स्थापन करू शकला नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले जाईल, असे सुतोवाच दिले होते. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील चर्चेतून अनेक मुद्दे सोडवण्यात आले असून, अद्याप अनेक गोष्टींवर चर्चा सुरू असल्याचे म्हटले होते.

मात्र शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये सत्ता स्थापनेवरून चर्चा सुरू असतानाच भापजने राजकीय खेळी करत अजित पवार यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले आहे.

पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी आमचे नेते पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानतो. त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीच्या रूपाने सेवा करण्याची संधी दिली. महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट बहुमत दिले होते. शिवसेनेने आमच्यासोबत युती करण्याऐवजी दुसऱ्यांबरोबर सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेमुळेच ही परिस्थिती निर्माण झाली. महाराष्ट्रासारख्या राज्याला राष्ट्रपती राजवट शोभत नाही. मी अजित पवार यांचे देखील आभार मानतो की, ते आमच्याबरोबर आले.

अजित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांना ट्विट करत शुभेच्छा दिल्या. फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतल्याने मी त्यांचे अभिनंदन करतो.

Leave a Comment