आमदारांच्या सह्यांच्या पत्राचा अजित पवारांनी केला गैरवापर


मुंबई – राज्यातील राजकारणाने आज नवे वळण घेतले आहे. राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा गेल्या महिनाभरापासून काही केल्या सुटत नव्हता. सत्ता स्थापनेचा प्रयत्न शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी करत होते. त्यातच आज एक मोठा राजकीय भूकंप झाला. भाजप आणि राष्ट्रवादीच्या बंडखोर गटाने सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री पदाची अजित पवारांनी शपथ घेतली. दरम्यान, राज्यपालांना राष्ट्रवादीच्या आमदारांच्या समर्थनाचे पत्र देखील अजित पवार यांनी दिले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यावर टीका केली आहे. आमदारांच्या सह्यांच्या पत्राचा अजित पवारांनी गैरवापर केला असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

नवाब मलिक यांनी यावेळी आमचा एकही आमदार फुटलेला नाही आणि फुटणार नाही असा विश्वास यावेळी व्यक्त केला. हे सरकार फसवणुकीतून तयार झालेले असल्यामुळे जरी शपथविधी झाला तरी हे सरकार जास्त दिवस टिकणार नसल्याचे नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. ही बैठक वायबी चव्हाण सेंटर येथे होणार आहे. आमचे सर्व आमदार आमच्या सोबत आहेत. या बैठकीसाठी सर्व आमदार मुंबईत येत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सर्व आमदार आपापल्या विधानसभा क्षेत्रामध्ये आहेत असे देखील ते म्हणाले.

Leave a Comment