उद्धव ठाकरेच घेतील मुख्यमंत्रीपदाचा अंतिम निर्णय – नवाब मलिक


मुंबई – सध्या राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या दिशेने हालचाली सुरू असून अंतिम टप्प्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील चर्चाही आली आहे. पण, अनेक तर्कविर्तक मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावरून लावले जात असतानाच मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाची महाविकासआघाडी असे सध्या महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरण जुळून आले असून सरकार स्थापनेचा स्पष्ट कौल भाजप-शिवसेना महायुतीला असताना मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडे शिवसेनेने आग्रह धरला होता. पण, यावर तडजोड न करण्याची भूमिका भाजपने घेतल्यामुळे शिवसेनेने वेगळी वाट धरली. भाजपला शिवसेना बाजूला गेल्याने १०५ जागा असूनही सरकार स्थापन करता आले नाही. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससमोर शिवसेनेने पाठिंब्यासाठी हात पुढे केला होता. त्यानंतर तिन्ही पक्षांमध्ये गेल्या महिनाभरात चर्चा सुरू असून, अखेर सत्तास्थापनेच्या जवळ पोहचले आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये समान किमान कार्यक्रमाचा मसुदा ठरल्यानंतर चर्चा झाली. त्यानंतर तिन्ही पक्षांमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी अंतिम निर्णय होणार असून, पुन्हा मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यासंदर्भात मुख्यमंत्रीपदाबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्रीपदामुळेच शिवसेना युतीतून बाहेर पडली असल्यामुळे आमचे त्यांचा सन्मान राखणे कर्तव्य आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर सरकारला एक चेहरा मिळेल. आम्ही तशी मागणी करू शकतो. पण, मुख्यमंत्रीपदाबद्दलचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे हेच घेतील. तो त्यांच्या पक्षाचा निर्णय असेल, असे मलिक म्हणाले.

मलिक शिवसेनेला भाजपकडून ऑफर देण्यात आल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, भाजपकडून शिवसेनेला अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्याची चर्चा आहे.पण असे काही झालेले नाही. असल्या काही बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जात आहे. पण खरच तशी ऑफर भाजपकडून आली असेल, तर तो निर्णय शिवसेना घेईल. त्यासाठीही आमच्या शुभेच्छा असतील. पण, माझ्या मते असे काही होणार नसल्याचा दावा मलिक यांनी केला.

Leave a Comment