२७ वर्षे ‘त्याने’ जमीन खोदली आणि पाण्याची तहान भागवली


छत्तीसगड – स्वतःचा उत्कर्ष असो किंवा करिअर ,जो -तो फक्त स्वतःचाच विचार करतो ;पण काही ध्येयवेडी माणसे असतात जी स्वतःची नव्हे तर समाजाचाही विचार करून झोकून देऊन काम करतात. दशरथ मांझी, ज्याने डोंगर खोदून गावासाठी रस्ता तयार केला. त्याच्याहीपुढे जाऊन एका अवलियाने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करू नये यासाठी चक्क तलावच खोदून पाण्याची व्यवस्था केली आहे विशेष म्हणजे तब्बल २७ वर्षे त्याने फावडे आणि कुदळ हातात घेऊन तलाव निर्मितीवर योगदान दिले आहे.

‘माऊंटन मॅन’ दशरथ मांझी यांना संपूर्ण देश ओळखतो. त्यांनी २२ वर्षे एकट्याने डोंगर खोदला आणि गावासाठी रस्ता तयार केला. छत्तीसगड राज्यातही असाच एक अवलिया आहे. ज्याने गावातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी एकट्याने तलाव खोदला आहे. शाम लाल असे या छत्तीसगडच्या ‘मांझी’चे नाव आहे. सजा पहाड गावचा रहिवासी असलेला शाम १५ वर्षांचा असताना स्वत: हातात कुदळ आणि फावडे घेत तलाव खोदण्यास सुरुवात केली.सुरुवातीला लोकांनी त्याला वेड्यात काढले ;पण आज २७ वर्षानंतर शाम गावकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. शाम आपल्या निर्णयावर ठाम होता. गावाजवळ असलेल्या जंगलामध्ये शाम रोज कुदळ आणि फावड्याने तलावाचे खोदकाम करायचा. अखेर शामच्या मेहनतीला यश आले आहे. मागील २७ वर्षांमध्ये शामने एक एकर जागेमध्ये १५ फुटी खोल तलाव बांधला आहे. शाम आज ४२ वर्षांचा झाला आहे, मात्र गावासाठी आपण काहीतरी केले याचे समाधान त्याच्या बोलण्यात दिसले.