महाविकासआघाडी विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका


मुंबई – शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तिन्ही पक्षांनी महाविकासआघाडी बनवत राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी एकत्र आले असून लवकरच त्यांच्याकडून सत्तास्थापनेची घोषणा होऊ शकते. यापार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात राज्यातील या राजकारणाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. निवडणूकीनंतरच्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवर या याचिकेमध्ये आक्षेप घेण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयात ही याचिका राज्यातील रहिवासी असलेल्या एस. आय. सिंह या व्यक्तीने दाखल केली आहे. यात म्हटले की, राज्यपालांना सर्वोच्च न्यायालयाने असे आदेश द्यावेत की त्यांनी जनमताविरोधात एकत्र आलेल्या या आघाडीचे सरकार स्थापन करण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीला निमंत्रण देऊ नये.

विधानसभा निवडणुकीत भाजपाला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ तर काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत. मुख्यमंत्रीपदावरुन भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये निकालानंतर सहमती न झाल्याने भाजपची शिवसेनेने साथ सोडली. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन सत्तास्थापनेची तयारी केली आहे. किमान समान कार्यक्रमावरही शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीनही पक्षांच्या सहमती झाली असल्यामुळे संभाव्य महाविकास आघाडीच्या स्थापनेवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे जाऊन ही आघाडी सत्तास्थापनेचा दावा करणार आहे.

Leave a Comment