विचित्र शोधांमुळे गमविले प्राण


आपण काही तरी नवीन करून पाहण्याच्या प्रयत्नांत क्वचित धोकाही पत्करत असतो. कधी कधी असले उद्योग जीवावरही बेतू शकतात. काही शोधकर्त्यांच्या बाबतीत नेमके हेच घडले. इतिहासामध्ये त्यांची नावे अजरामर झाली, ती नवीन शोध लावल्यामुळे नाही, तर त्या शोधांपायी त्यांना आपले प्राण गमवावे लागले म्हणून.

सिल्व्हेस्टर रोपर या अमेरिकन माणसाने रोपर स्टीम व्हेलोस्पीड या वाफेवर चालणाऱ्या गाडीचा शोध लावला. १८९६ च्या जून महिन्यामध्ये सिल्व्हेस्टर त्याच्या नव्या व्हेलोस्पीडची चाचणी करीत होता. ताशी चाळीस मैल इतक्या गतीने धावणाऱ्या व्हेलोस्पीड मध्ये बसलेला असताना सिल्व्हेस्टर याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला.

फ्रांझ रायीशेल्ट या फ्रेंच मनुष्याने पॅराशूटची कल्पना अस्तित्वात आणली. पॅराशूटमध्ये ज्याचे परिवर्तन केले जाऊ शकते असा एक फ्लाईंग सूट त्याने खास वैमानिकांना वापरता यावा म्हणून तयार केला. क्वचित प्रसंगी विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान आकाशातच बंद होते. अश्या वेळी वैमानिकांना सुरक्षितपणे विमानातून बाहेर पडता यावे म्हणून हा सूट फ्रांझने तयार केला. या सूटची चाचणी करण्यासाठी त्याने माणसाच्या वजनाइतक्या वजनाच्या पुतळ्याला हा सूट घातला आणि हा पुतळा त्याने उंचीवरून खाली फेकला. योग्य वेळी त्या सूट मधील पॅराशूट उघडले आणि तो पुतळा सुखरूप जमिनीवर उतरला. फ्रांझची चाचणी यशस्वी झाली होती. आता त्याने हा प्रयोग जिवंत माणसावर करण्याचे ठरविले. या प्रयोगासाठी कोणी तयार होत नसल्याने फ्रान्झने स्वतःच हा सूट घालून आयफेल टॉवर वरून उडी मारण्याचा निश्चय केला. त्याच्या आप्तेष्टांनी अनेकदा त्याला या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करूनही फ्रांझने आयफेल टॉवर वरून उडी मारली. पण ऐन वेळी त्याच्या सूटचे पॅराशूट न उघडल्याने उंचीवरून खाली पडून त्याचा मृत्यु झाला.

मारी क्युरी ह्या सुप्रसिद्ध महिला शास्त्रज्ञ होत्या. रेडियम आणि पोलोनियम या किरणोत्सर्गी तत्वांचा त्यांनी शोध लावला. नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या त्या प्रथम महिला शास्त्रज्ञ होत्या. रेडियमच्या शोधावर काम करीत असताना मारी क्युरी रेडियमने भरलेल्या टेस्ट ट्यूब नेहमी आपल्या झग्याच्या खिशांमध्ये ठेवीत असत. त्यामुळे त्यांच्या शरीरावर किरणोत्सर्गी रेडियमचे दुष्परिणाम होण्यास सुरुवात झाली.किरणोत्सर्गी साहित्याच्या सततच्या संपर्कामुळे मारी यांना अप्लास्टिक अनिमिया या रोगाने ग्रासले. या आजारातच त्यांचा मृत्यू झाला. आजही त्यांच्या प्रयोगशाळेतील वस्तू किरणोत्सर्गी असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे तिथे जाणाऱ्या शास्त्रज्ञांना ‘protective clothing’ चा वापर करावा लागतो.

Leave a Comment