गॅस सिलेंडर वेळेत न आल्यास कापले जाणार डिलरचे कमिशन


नवी दिल्ली – नेहमीच डिलरच्या मनमानीचा त्रास गॅस सिलेंडरच्या ग्राहकांना सहन करावा लागतो. पण ग्राहकांना आता डिलरने वेळेत एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा केला नाही तर त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. विक्रेत्यांच्या विरोधात सेवेसंबंधित अधिक तक्रारी असल्यास त्याला मिळणारे कमिशन तेल मार्केटिंग कंपन्यांच्या प्रस्तावानुसार कापण्यात येणार आहे. तेल कंपन्यांनी हा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाकडे पाठवला असून लवकरच या प्रस्तावाला पेट्रोलियम मंत्रालयाची मंजूरी मिळेल.

डिलरच्या मनमानी कारभाराला चाप बसवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय असून गॅस सिलेंडर ग्राहकांना वेळच्या वेळी उपलब्ध होण्यासोबत अन्य उत्तम सुविधा सुद्धा मिळवता येतील. तसेच डिलरना त्यांच्या सेवेत अधिक बदल करणे महत्वाचे ठरणार आहे. नियमानुसार ग्राहकांना 24 ते 48 तासाच्या आतमध्ये गॅस सिलेंडर बुक करुन सुद्धा न दिल्यास कारवाई होणार आहे. तसेच गॅस सिलेंडर डिलरना 5 स्टारची रेटिंगसुद्धा लागू करण्यात येणार आहे. जर एखाद्या डिलरला ग्राहकांकडून 2 स्टार मिळाले तर त्याच्या विरोधात कारवाई होणार आहे.

या प्रस्तावाला पेट्रोलियम मंत्रालयाने मंजूरी दिल्यानंतर डिलरची सर्व्हिस ही कमिशन सोबत लिंक करण्यात येणार आहे. डिलरला एका सिलेंडरमागे साठ रुपये कमिशन मिळते. तेल कंपन्यांच्या प्रस्तावात असे म्हटले आहे की, कार्यक्षमतेच्या आधारावर दंड किंवा कमिशनचे निर्धारण केले जाते. त्यामध्ये अशी सुद्धा सिफारिश करण्यात आली आहे की, कमिशनमध्ये 20 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात येऊ शकते.

Leave a Comment