1 डिसेंबरपर्यंत मोफत मिळणार फास्टॅग

देशभरातील सर्व टोल नाके 1 डिसेंबरपासून कॅशलेस होणार आहेत. विना फास्टॅगचे तुम्ही टोल नाका पार करू शकत नाही. जर तुम्ही अद्याप फास्टॅग खरेदी केले नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने फास्टॅगला चालना देण्यासाठी येत्या 1 डिसेंबरपर्यंत याला मोफत उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. याची घोषणा केंद्रीय रस्ते परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी केली आहे.

गडकरी यांनी सांगितले की, 1 डिसेंबरपासून टोल नाक्यांवरील रोख व्यवहार बंद करण्यात येत आहेत. केवळ फास्टॅगद्वारे टोल भरला जाईल.

यासाठी एनएचएआयने पुर्ण तयारी केली आहे. सध्या एनएचएआयच्या कक्षेत 537 टोल नाके आहेत. यातील 17 टोल नाके सोडून इतर टोल नाके हे 30 नोव्हेंबरपासून फास्टॅगशी जोडले जातील. इतर बाकी टोल नाक्यांचे अद्याप काम सुरू आहे. त्यामुळे तेथे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल वसूलीची सुविधा अद्याप लावलेली नाही.

फास्टॅग विकताना 150 रुपयांचे डिपॉजिट घेतले जाते. मात्र याला चालना देण्यासाठी एनएचएआयने निःशुल्क केले आहे. म्हणजेच याला घेण्यासाठी 150 रुपये द्यावे लागणार नाहीत. हे मोफत फास्टॅग केवळ एनएचएआयच्या प्वाइंट ऑफ सेल पीओएसवर मिळतील. बँकेतून ग्राहकांनी खरेदी केल्यास यासाठी शुल्क भरावे लागेल.

पुढील महिन्यांपासून ज्या गाड्यांवर फास्टॅग लावलेले नाही, त्या गाड्या इलेक्ट्रिक टोल लेनमध्ये घुसल्यावर त्यांच्याकडून दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे. त्यामुळे फास्टॅग असणे अनिवार्य आहे.

 

Leave a Comment