पुढील पाच वर्ष राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचाच : संजय राऊत


मुंबई – शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पुढील पाच वर्ष महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदी शिवसैनिकच विराजमान होईल. तसेच आता कोणी तिऱ्हाईताने आम्हाला इंद्रपद दिले तरी आम्ही माघार घेणार नसल्याची, कठोर भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर हा निर्णय शिवसेनेने स्वाभिमानाने घेतला असल्याचे ते पुढे म्हणाले.

राज्यात पुढील पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल आणि तिन्ही प्रमुख पक्षांची या निर्णयावर चर्चा झाली असून यावर त्यांनी आपली सहमतीही दर्शवली आहे. हा निर्णय शिवसेनेने महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी घेतलेला आहे. महाराष्ट्राला लवकरच एक कणखर नेतृत्व मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यातील जनतेची आणि लाखो शिवसैनिकांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा आहे. राज्यातील जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या भावना ते समजून घेऊन त्याला मान देतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असून सरकार स्थापन करण्यासाठी त्यामध्ये काही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. लवकरच ती पूर्ण केली जाईल. महाराष्ट्राची सत्ता ही दिल्ली चालवू शकणार नाही. आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व राज्याला हवे आहे. पण उद्धव ठाकरे यांनीच आघाडी सरकारचे नेतृत्व करावे, अशी सर्वांची इच्छा आहे आणि ते सर्वांच्या भावनांना मान देतील, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सत्तास्थापनेपूर्वी गुरूवारी रात्री उशीरा बैठक झाली. यामध्ये ‘महाविकासआघाडी’ बाबात निर्णय जवळपास निश्चित झाल्याचे म्हटले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी आज होणाऱ्या नियोजित बैठकीपूर्वी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत यावेळी युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते. या बैठकीत काय घडले याबाबत माहिती मिळाली नसली तरी ही बैठक सकारात्मक झाल्याचे संकेत राऊत यांनी दिले.

Leave a Comment