ऐतिहासिक कसोटीत बांगलादेशचा १०६ धावांत खुर्दा


कोलकाता: भारताने पहिल्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीत बांगलादेशचा पहिल्या डावांत १०६ धावांत खुर्दा केला आहे. बांगलादेशचा संपूर्ण संघ ३०.३ षटकांत माघारी परतला. भारताकडून सर्व दहा बळी वेगवान गोलंदाजांनी टिपले. इशांत शर्माने २२ धावांत ५ बळी घेतले तर उमेश यादवने २ आणि मोहम्मद शमीने २ बळी टिपले.

बांगलादेशाच्या सलामीवीर शादमान इस्लमा, अखेरच्या फळीत लिटन दास आणि नईम हसन यांचा अपवाद वगळता एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही. पहिल्या सत्रापर्यंत बांगलादेशचा संघ ६ गड्यांच्या मोबदल्यात ७३ धावांपर्यंत मजल मारु शकला होता.

बांगलादेशचा नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय चुकला. इशांत शर्माने १५ धावसंख्येवर इमरुल कायसला माघारी धाडत बांगलादेशला पहिला धक्का दिला. यानंतर बांगलादेशच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. एकामागोमाग एक फलंदाज विकेट फेकत राहिल्यामुळे बांगलादेशची परिस्थिती बिकट झाली. अवघ्या ३८ धावांवर बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत परतला होता. उमेश यादव, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी या गोलंदाजांनी भेदक मारा करत बांगलादेशच्या डावाचे कंबरडे मोडले.

Leave a Comment