फसवणूक करुन मते मिळवल्या प्रकरणी शिवसेनेविरोधात मतदाराची पोलीस ठाण्यात तक्रार


औरंगाबाद – हिंदुत्वाच्या नावाखाली शिवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मते मागितली. पण, शिवसेनेने भाजपशी फारकत घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याचा आरोप एका मतदाराने केला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, चंद्रकांत खैरे आणि औरंगाबाद मध्य मतदार संघातून शिवसेनेकडून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधात त्याने फसवणूक केल्याची बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

जनतेने विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेनेच्या महायुतीला कौल दिला. पण, भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद सुरू होता. त्यानंतर सत्ता स्थापनेस भाजपने नकार दिला. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. त्यातच आता संजय राऊत यांनी डिसेंबर महिन्यापूर्वीच महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे सांगितले.

शिवसेनेच्या विरोधात औरंगाबादेतील मतदार रत्नाकर भीमराव चौरे यांनी तक्रार दाखल केली. उद्धव ठाकरे, प्रदीप जैस्वाल, चंद्रकांत खैरे यांनी १ महिन्यापूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 10 ते 12 ऑक्टोबर दरम्यान औरंगाबादमध्ये प्रचार केला. यावेळी शिवसेना भाजप युतीला हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी मतदान करा, असे सांगितले होते. मी व माझ्या कुटुंबाने या आश्वासनावर विश्वास ठेवून महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना मतदान केले. निवडणुकीचा निकाल पाहता भाजप समर्थकांच्या मतावर शिवसेनेचे जैस्वाल निवडून आले. पण, शिवसेनेने निकालानंतर भाजप पक्षाशी असलेली युती तोडून सरकार स्थापन न केल्यामुळे आमची फसवणूक झाल्याचे आम्हाला वाटत असल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Leave a Comment