रामवाडी ते वनाज दरम्यान मेट्रोच्या कामाला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील


मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी पुणे मेट्रोचा मार्ग परस्पर बदलणाऱ्या एमएमआरसीएलला मोठा दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने या प्रकल्पाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवत यासंदर्भातील याचिकाही फेटाळून लावली आहे.

एमएमआरसीएलने राम वाडी ते वनाज व्हाया आगा खान पॅलेस असा मेट्रोचा मार्ग सुरूवातीला निश्चित केला होता. पण मेट्रोच्या मार्गात अचानक बदल करत आगा खान पॅलेस ऐवजी हा मार्ग आता कल्याणी नगर येथील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य येथे वळविण्यात आल्यामुळे या मेट्रो प्रकल्पामुळे हे अभयारण्य बाधित होणार असून येथील सुमारे 300 झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार आहे. याशिवाय 185 कोटी रुपयांनी या मार्गाचा खर्चही वाढणार आहे.

पण येथील पर्यावरणाला धोका पोहोचू नये यासाठी कल्याणी नगर येथील रहिवासी दीपक नाथानी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गेल्या सुनावणीवेळी या याचिकेवर मार्ग बदलण्यासंदर्भात केंद्र सरकारकडून जोपर्यंत अधिसूचना जारी केली जात नाही, तोपर्यंत रामवाडी ते वनाज मार्गावरील मेट्रोचे काम थांबवा, असे आदेश दिले होते. पण पुणे मेट्रोचे रखडलेले काम पाहता उच्च न्यायालयाने ही स्थगिती उठवत कोणताही दिलासा याचिकाकर्त्याना देण्यास नकार देत त्यांची याचिका फेटाळून लावली.

Leave a Comment