असे होते प्रिन्सेस डायनाच्या आयुष्याचे शेवटचे काही महिने


प्रिन्स चार्ल्सशी घटस्फोट घेतल्यानंतर प्रिन्सेस डायनाच्या आयुष्याने एक नवे वळण घेतले. अनेक समाजकल्याणकारी संस्थांबरोबर संलग्न होऊन तिने आपल्या प्रसिद्धीचा वापर, या समाजकल्याणकारी संस्थांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केला. पण जेव्हा डायनाच्या आयुष्यामधे काही स्नेहबंध नव्याने निर्माण झाले, तेव्हा ती पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली. आधी हस्नात खान हा हृदयरोगतज्ञ आणि नंतर डोडी अल फायेद यांच्याबरोबर असलेल्या प्रेमासंबंधांमुळे डायना पुन्हा एकदा सर्वांच्याच चर्चेचा विषय बनली. ती करित असलेल्या सामाजिक कार्यापासून, ते डोडी अल फायेद बरोबरच्या तिच्या मेडीटेरेनिअन वरील सफारीपर्यंतचे तिच्या आयुष्याचे शेवटचे काही महिने तिने कसे व्यतीत केले याबद्दल थोडेसे.

१९९७ च्या मे महिन्यामध्ये डायना पाकिस्तानमध्ये लाहोर इथे गेली. सुप्रसिद्ध क्रिकेटवीर इम्रान खान याने सुरु केलेल्या कॅन्सर हॉस्पिटल साठी आर्थिक निधी उभा करण्यास डायनाने इम्रान खानला सहाय्य केले. डायना आणि इम्रान खान यांचा परिचय पूर्वीपासूनचा होता. पाकिस्तानी हृदयरोगतज्ञ हस्नात खान यांच्याशी त्याकाळी डायनाचे प्रेमसंबंध होते, तिला त्यांच्याशी लग्न करण्याची ही इच्छा होती, पण ते नाते फार काळ टिकू शकले नाही, असा खुलासा इम्रान खानने डायनाच्या मृत्युनंतर काही वर्षांनी केला. डायनाशी झालेल्या खासगी संभाषणांच्या द्वारे, डायनाचे हस्नात खान यांच्यावर मनापासून प्रेम होते असे लक्षात आल्याचे ही इम्रान खान यांनी म्हटले आहे.

डायना ला बॅले हा नृत्यप्रकार अतिशय प्रिय होता. मोठे होऊन बॅलेरीना होण्याचे, डायनाचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. पण या नृत्याप्रकारसाठी जेवढी शारीरिक उंची आवश्यक असते, त्या पेक्षा डायनाची उंची खूपच जास्त असल्याने तिला तिच्या स्वप्नावर पाणी सोडावे लागले होते. तरी ही या नृत्यप्रकाराविषयीचे प्रेम तिच्या मनात कायम होते. चार्ल्सशी घटस्फोट घेतल्यानंतर, १९९७ च्या जून महिन्यामध्ये डायनाने इंग्लिश नॅशनल बॅले या संस्थेसाठी आपला वेळ देण्यास सुरुवात केली. तिच्या उपस्थितीमुळे ही संस्था प्रसिद्धीच्या झोतात आली, आणि त्यामुळे या संस्थेला भरपूर आर्थिक लाभही झाला. याच महिन्यामध्ये डायना न्यूयॉर्क येथे हिलरी क्लिंटन यांच्या भेटीसाठी गेलेली असताना, मदर तेरेसा यांनाही ती भेटली. तेव्हा मदर तेरेसा ही न्यूयॉर्क मध्ये होत्या. डायनाने १९९७ च्या जून महिन्यामध्ये तिच्या काही सुप्रसिद्ध पोशाखांचा लिलाव केला. या लिलावामध्ये डायनाचे एकूण ७९ पोशाख विकले जाऊन त्यातून तब्बल ३.२५ मिलियन पौंड इतकी रक्कम उभी राहिली. ही सर्व रक्कम, डायना ज्या समाजकल्याणसंस्थांसाठी काम करीत होती त्यांच्या विकासासाठी खर्च करण्यात आली.

१९९७ च्या जुलै महिन्यामध्ये डायनाने आपला छत्तिसावा वाढदिवस साजरा केला. तिच्या मुलांनी तिला या दिवशी तब्बल नव्वद पुष्पगुच्छ भेटीदाखल पाठविले. याच महिन्यामध्ये डायना डोडी अल फायेद सोबत फ्रान्समधील सेंट त्रोपेझ येथे गेली होती. त्यावेळी तिची दोन्ही मुले विलियम आणि हॅरी तिच्यासोबत होती. याच काळादरम्यान डायना आणि डोडी यांच्यामधील जवळीक वाढली असल्याचे म्हटले जाते.

१९९७ च्या ऑगस्ट महिन्यामध्ये डायना बोस्नियाची राजधानी सारायेवो येथे गेली होती. इथे तिने लँड माईन्सच्यामुळे उद्भाविणाऱ्या धोक्यांकडे जगाचे लक्ष वेधून घेतले. लँड माईन्स ही जमिनीखाली पुरलेली स्फोटके असतात, ज्याच्यावर चालताना पाय पडल्याने त्यांचा स्फोट होतो. लँड माईन्स च्या स्फोटांमुळे सारायेवो येथील अनेक नागरिकांना कायमचे अपंगत्व आले होते. अश्या अनेक अपंग नागरिकांची डायनाने भेट घेतली, तसेच त्यांच्या पुनर्वसनाच्या कामी ही तिने रस घेतला. डायना बोस्निया हून परतण्यापूर्वीच, तिच्या आणि डोडीच्या प्रेमसंबंधाविषयीच्या बातम्यांनी वर्तमानपत्रे भरभरून लिहू लागली होती. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवसात डायना डोडीसोबत त्याच्या आलिशान बोटीवर गेली होती. तिथून ते दोघे सार्डिनीया येथे जाऊन त्यानंतर फ्रान्समध्ये, पॅरिस येथे परतले. तो दिवस ३० ऑगस्टचा होता. या रात्री पॅरिस येथील आलिशान रिट्झ हॉटेल मध्ये जेवण घेऊन डायना आणि डोडी, डोडीच्या घराकडे जाण्यास निघाले. पण वाटेतच त्यांना पत्रकारांनी गाठले आणि डायनाची छायाचित्रे मिळविण्याच्या प्रयत्नात त्यांनी डायना आणि डोडी यांच्या गाडीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्या पत्रकारांपासून पिच्छा सोडविण्यासाठी गाडीच्या वाहनचालकाने गाडी भरधाव वेगाने चालवित पोन्त द आल्मा च्या बोगद्यामध्ये नेली, आणि तिथेच त्याचा गाडीवरील ताबा सुटून गाडीला भीषण अपघात झाला. गाडीचा चालक ऑनरी पॉल आणि डोडी यांचा तत्काळ मृत्यू झाला, आणि डायना व तिचा अंगरक्षक गंभीर जखमी झाले. अपघात झाल्याच्या काही वेळातच रुग्णवाहिका आल्या आणि डायनाला उपचारांसाठी रुग्णालयात नेले गेले. मात्र ३१ ऑगस्ट च्या पहाटे, उपचारांदरम्यानच तिचा मृत्यू झाला.

डायनाच्या मृत्युच्या सहा दिवसांनंतर तिला तिच्या परिवाराच्या मालीकीच्या असलेल्या अल्थोर्प इस्टेट येथे अखेरचा निरोप देण्यात आला. तत्पूर्वी वेस्टमिन्स्टर अॅबी येथे डायनाला श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जगभरामध्ये अडीच मिलियन लोकांनी पहिले. २०१७ च्या ऑगस्ट महिन्यामध्ये डायनाच्या दुर्दैवी निधनाला वीस वर्षे पूर्ण होत आहेत.

Leave a Comment