वयाची शंभरी पार केलेल्या या आजीने पूर्ण केले अर्धवट राहिलेले इयत्ता चौथीचे शिक्षण


(source)
कोलम – शिकण्याला कोणतीही वयोमर्यादा नसते, पण त्यासाठी प्रबळ इच्छाशक्तिची गरज असते. असेच काहीसे केरळ मधील एका १०५ वर्षांच्या आजीबाईंनी करुन दाखवले आहे. या आजीबाईंचे नाव भागीरथी अम्मा असे असून वयाची शंभरी पार केलेल्या या आजीबाईंनी आपले अर्धवट राहिलेले इयत्ता चौथीचे शिक्षण पूर्ण करीत नवा इतिहास रचला आहे.

या भागीरथी अम्माने केरळच्या साक्षरता अभियानांतर्गत चौथीचे शिक्षण पूर्ण केले. अम्मा साक्षरता अभियानाच्या इतिहासात शिक्षण घेणारी सर्वात वयस्कर व्यक्ती ठरल्या आहेत. शिकण्याची अम्मा यांना इच्छा होती. पण त्यांचे शिक्षण त्यांच्या आईच्या निधनामुळे अपूर्ण राहिले. कारण आपल्या भावंडांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. त्या या सर्व जबाबदाऱ्यांमधून बाहेर आल्यानंतर त्यांच्या पतीचे वयाच्या ३० व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर पुन्हा सहा मुलांची जबाबदारी त्यांच्यावर आल्यामुळे त्यांच्या शिक्षणात पुन्हा खंड पडला. पण त्यांनी आता आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करीत चौथीची परीक्षा दिली आहे. आपल्याला यामुळे अतिशय आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

याबाबत माहिती देताना साक्षरता मिशनचे व्यवस्थापक पीएस श्रीकला यांनी सांगितले की, केरळच्या साक्षरता मिशनच्या आजवरच्या इतिहासातील भागीरथी अम्मा सर्वात वयस्कर समान शिक्षण प्राप्त करणाऱ्या नागरिक बनल्या आहेत. साक्षरता मिशनचे तज्ज्ञ वसंतकुमार यांनी सांगितले की, लिहिण्यासाठी भागीरथी अम्माला अडचण येत असल्याने पर्यावरण, गणित आणि मल्याळम या विषयांचे पेपर त्यांनी तीन दिवसांत लिहीले. लिहिण्यामध्ये त्यांना त्यांच्या छोट्या मुलीने मदत केली. त्यांची बुद्धी या वयातही तल्लख असल्याचे वसंतकुमार यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांना दिसण्यात कुठलीही अडचण नाही तसेच त्या उत्तम प्रकारे गाऊही शकतात असे त्यांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया देताना अम्माने सांगितले की, मी जेव्हा ९ वर्षांची होती तेव्हा मला तिसऱ्या इयत्तेच शिक्षण सोडावे लागले होते. एवढ्या आत्मियतेने शिक्षण घेणाऱ्या अम्मांजवळ आधार कार्ड नसल्यामुळे विधवा पेन्शन किंवा ज्येष्ठ नागरिक पेन्शनही त्यांना मिळत नाही. पण, ही परीक्षा पास केल्यानंतर आता तरी संबंधित अधिकारी त्यांना पेन्शन मिळवून देण्यास मदत करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment