पायलटचा गणवेश परिधान करुन विनामूल्य प्रवास करायची ही व्यक्ती


नवी दिल्ली – दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावरून आयजीआय विमानतळ पोलिसांनी एका बनावट पायलटला अटक केली आहे. विमानतळावर वैमानिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांच्या लालसेपोटी जर्मनीतील लुफ्थांसा एअरलाइन्सचा गणवेश परिधान करून तो एअर एशियाच्या विमानाने कोलकात्याला जाण्याच्या तयारीत होता.

पोलिसांनी सुरुवातीच्या चौकशीत आरोपी कॉर्पोरेट ट्रेनिंग देण्याचे काम करतो आणि कोलकाता येथे त्याचे कार्यालय असल्याचे समोर आले आहे. विमानतळ पोलिस उपायुक्त संजय भाटिया यांनी सांगितले की आरोपीचे नाव राजन महबुबानी (वय 48) असे असून, तो वसंत कुंज, दिल्लीचा रहिवाशी आहे.

सोमवारी संध्याकाळी लुफ्थांसा जर्मन एअरलाइन्सच्या मुख्य सेफ्टी ऑफिसरने पोलिसांकडे तक्रार दिली होती की लुफ्थांसाच्या पायलटचा गणवेश परिधान केलेला एक मनुष्य नेम प्लेट लावून कोलकात्याला जाण्यासाठी एअर एशियाच्या विमानात चढण्याच्या प्रयत्नात होता. विमानतळावर वैमानिकांना मिळणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा त्याचा प्रयत्न होता.

ही तक्रार मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आरोपीच्या चौकशीदरम्यान तो पायलट म्हणून आतापर्यंत 15 वेळा प्रवास केल्याचे निष्पन्न झाले. विमानतळावर वैमानिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा फायदा घेण्यासाठी तो बनावट गणवेश परिधान करीत असे. बर्‍याच वेळा त्याने आपली जागा अपग्रेड केली आणि लवकर जाण्यासाठी त्याने पायलटचा गणवेश बनवली होती.

त्याने कोलकाता येथून पायलटचा गणवेश तयार केल्याचे पोलिसांना तपासणीत आढळले. आरोपी पंजाब विद्यापीठाचा पदवीधर आहे. चौकशीदरम्यान आरोपीने असे सांगितले की, त्याला वेगवेगळ्या गणवेश परिधान करुन फोटो काढण्याचा आणि त्याचा व्हिडिओ टीक-टॉकवर अपलोड करण्याची फार आवड आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचा एक फोटो कर्नलच्या गणवेशात सापडला होता. पोलिस सध्या आरोपींकडे चौकशी करत आहेत.

Leave a Comment