आगामी पाच ते सहा दिवसांमध्ये पूर्ण केली जाईल सत्ता स्थापनेची प्रक्रिया


मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उद्या दुपारपर्यंत राज्यातील सत्तास्थापनेबाबत चित्र स्पष्ट होईल, असे म्हटले आहे. तीन आठवड्यांचा कालावधी राज्यातील निवडणुकांचे निकाल लागून उलटला असून राज्यात अद्यापही सरकार स्थापन करण्यात कोणत्याही पक्षाला यश आले नाही. त्यातच सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यातच लवकरच राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटेल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे.

सत्ता स्थापनेची प्रक्रिया येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये पूर्ण केली जाईल. त्याचबरोबर डिसेंबरच्या आधीच राज्यात स्थिर सरकार स्थापन होईल आणि मुख्यमंत्रीपदी शिवसैनिक विराजमान होईल, असे सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. सरकार स्थापनेतील असलेले सर्व अडथळे दूर झाले असून राज्यातील राष्ट्रपती राजवट दूर करण्यासाठी काही कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतील. तसेच बहुमताचा आकडा पुराव्यानीशी राज्यपालांना द्यावा लागतो. लवकरच ती प्रक्रिया पूर्ण होईल आणि डिसेंबर महिना उजाडेपर्यंत सरकार स्थापन होईल, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

कोणीही राष्ट्रपती राजवटीदरम्यान सरकार स्थापन करण्याचा दावा केल्यास ते सरकार स्थापन करू शकतात. असे ज्या लोकांना वाटते राज्यात लोकप्रिय सरकार येऊ नये, राष्ट्रपती राजवटी प्रदीर्घ काळ रहावे आणि मुख्यमंत्रीपदी शिवसैनिक विराजमान होऊ नये, असे लोक माध्यमांमध्ये विविध बातम्या पेरत असल्याचे त्यांनी नमूद केले. कोणतेही दोन गट आमच्यामध्ये नसून कोणताही संभ्रम शिवसेनेत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment