मॉब लिंचिंगसारख्या घटनांवर आळा घालण्यासाठी गृह मंत्रालयाच्या राज्यांना विशेष सूचना


नवी दिल्ली – केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत प्रत्येक राज्याला आणि केंद्रशासित प्रदेशांना मॉब लिंचिंगसारख्या घटनांवर आळा घालण्यासाठी विशेष सूचना दिल्याचे स्पष्ट केले.

केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतची माहिती सीपीआय पक्षाचे खासदार के. सुब्बारायन आणि एम. सेल्वराज यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. दृकश्राव्य माध्यमातून ‘फेक न्यूज’ आणि अफवांवर लोकांनी विश्वास न ठेवता, त्यांची विश्वासार्हता पडताळून पाहण्याबाबत जागरूक करण्यात येत आहे. हे सर्वकाही सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार करण्यात येत असल्याचेही गृहमंत्रालयाने स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाने १७ जुलै २०१८ ला दिलेला निकाल आणि २३ जुलै, तसेच २५ सप्टेंबर २०१८ ला दिलेल्या निर्देशांनुसार सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत सूचना दिल्या गेल्या आहेत. गृहमंत्रालयाने त्याचबरोबर नागरिकांसोबतच माध्यम सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनाही फेक न्यूज आणि अफवांना पडताळून पाहण्यासंबंधी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या गेल्या असल्याचेही सांगितले.

अफवा तसेच खोट्या बातम्यांमुळे होणाऱ्या मॉब लिंचिंगच्या बळींची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढली आहे. समाजमाध्यमांद्वारे या अफवा मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.

Leave a Comment