जाणून घ्या जॉन आणि जॅकलिन केनेडी यांच्या परिवाराबद्दल ?


अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जॉन केनेडी आणि त्यांच्या पत्नी जॅकलीन हे दाम्पत्य, अमेरिकन लोकांच्या मनामध्ये घर करून राहिले होते. त्यांचे राहणीमान, त्यांच्या बसण्या-बोलण्याच्या सवई, ते वापरत असलेले फॅशनेबल कपडे या सगळ्याच गोष्टींबद्दल अमेरिकन नागरिकांच्या मनामध्ये कायमच कुतूहल असे. जॅकलीन केनेडी ह्या त्याकाळच्या फॅशन आयकॉन समजल्या जात असत. अश्या या सुप्रसिद्ध केनेडी घराण्यामध्ये काही गोष्टी अश्या होत्या की त्यांच्याबद्दल ऐकल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही.
जॉन केनेडी यांच्या आई अतिशय कडक शिस्तीच्या म्हणून ओळखल्या जात असत. त्यांच्या घरामध्ये त्यांनी वागण्या-बोलण्याचे काही नियम घालून दिले होते. त्या नियमांचे उल्लंघन कोणीही केलेले त्यांना मुळीच खपत नसे. असाच एक नियम म्हणजे घरातील कुठल्याही लहान मुलाला रडायची परवानगी नसे. त्याचबरोबर मुलांच्या आहाराच्या बाबतीतही नियम असेच कडक होते. मुलांना मनाला येईल ते खाण्याची परवानगी नसे. त्याचबरोबर कुठल्याही कामाला उशीर केलेला ही घरामध्ये खपवून घेतला जात नसे. दिवसभरामध्ये मुलांना काही ना काही विषय अभ्यासासाठी दिले जात असत, त्या विषयांचा अभ्यास करून त्याबद्दल एक रिपोर्ट तयार करून, रात्री जेवणाआधी मुलांना तो रिपोर्ट वाचून दाखवावा लागत असे.

सतत होत असणाऱ्या पाठीच्या आणि पोटाच्या विकारांमुळे केनेडी यांना दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी सैन्यामध्ये रुजू होता आले नाही. पण आपल्या वडिलांच्या प्रसिद्धीचा उपयोग करीत त्यांनी ऑक्टोबर १९४१ साली सैन्यामध्ये प्रवेश मिळविला आणि पाठीचे व पोटाचे आजार असूनही युद्धामध्ये लढताना त्यांनी कीर्ती मिळविली.

जॉन केनेडी यांचे शिक्षण अमेरिकेतील दोन अतिशय प्रसिद्ध शिक्षण संस्थांमध्ये झाले. पदवीपूर्व शिक्षणासाठी त्यांना प्रिन्स्टन येथे प्रवेश मिळाला. पण त्यानंतर लवकरच त्यांना पोटाच्या व्याधीने ग्रासले. त्यामुळे त्यांना शिक्षण काही काळ सोडावे लागले. आजार बरा झाल्यानंतर त्यांनी हारवर्ड विद्यापीठात प्रवेश मिळविला आणि आपले शिक्षण पूर्ण केले.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी सैन्यात रुजू झाल्यानंतर एक दिवस अचानक जॉन यांच्या वडिलांना, जॉन लढाई च्या दरम्यान बेपत्ता झाल्याची बातमी मिळाली. पण जॉन यांच्या वडिलांचा या बातमीवर विश्वास बसला नाही. जॉन जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असेल याची त्यांना खात्री होती म्हणून जॉन बेपत्ता झाल्याची ही बातमी त्यांनी आपल्या परिवारापासून लपवून ठेवली. जॉन यांच्या सैन्यातील साथीदारांनी जॉन चा मृत्यू झाला असावा असे समजून त्यांना श्राद्धंजली वाहण्याचा कार्यक्रम ही करून टाकला. मात्र त्यानंतर एका आठवड्याने जॉन सुखरूप असल्याची बातमी सर्वांना समजली.

राजकारणामध्ये प्रवेश करण्या अगोदर जॉन ह्यांचा लेखन आणि पत्रकारितेमध्ये रस होता. वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी त्यांनी ‘व्हेन इंग्लंड स्लेप्ट’ नावाचे पुस्तक लिहिले. १९४५ साली त्यांनी एका वृत्तपत्रासाठीही काम केले. १९५७ साली त्यांच्या ‘प्रोफाइल्स इन करेज’ या आत्मचरित्रासाठी त्यांना पुलित्झर पुरस्काराने गौरविण्यात आले.

जॅकलीन केनेडी ह्यांचे लग्न १९५२ साली, जॉन केनेडी यांच्याशी होण्या आधी जॉन हसटेड यांच्याशी ठरले होते. पण पुढे त्यांच्यामध्ये काही कारणांनी मतभेद झाल्यामुळे जॅकलीन यांनी हे नाते संपविणे पसंत केले. त्यानंतर दोन महिन्यांनी जॅकलीन यांची एका डीनर पार्टीच्या प्रसंगी जॉन केनेडी यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना पसंत करून १९५३ साली लग्न केले.

जॅकलीन यांनी जॉन यांच्याशी लग्न केले खरे पण कालांतराने दोघांचे एकमेकांशी पटेनासे झाले. जॉन राष्ट्रपती होण्याआधीच जॅकलीन यांना घटस्फोट हवा होता. पण जॉन यांच्या राजनैतिक प्रतिमेवर या घटस्फोटाचा विपरीत परिणाम होईल या भीतीने जॉन यांच्या वडिलांनी जॅकलीन ने जॉन बरोबरच राहावे असा आग्रह धरीत, एक मिलियन डॉलर्स जॅकलीन यांना देऊ केले होते. जॉन यांच्या आईने देखील जॅकलीन यांनी जॉन केनेडी यांचे विवाहबाह्य संबंध मान्य करावेत असा सल्ला दिला.

जॉन यांचे वडील अतिशय श्रीमंत होते आणि दरवर्षी ते आपल्या संपत्तीचा काही हिस्सा आपल्या मुलांना देत असत. त्यामुळे जॉन यांना पैशाची कमतरता कधीच भासली नाही. म्हणून आपला पगार जॉन अनेक संस्थांना दान करून टाकत असत.

Leave a Comment