१० दिवसात दंड न भरल्यास आता वाहनचालकांना होणार अटक


मुंबई – वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी आणि नियमांचे पालन करण्यासाठी वाहतुक पोलीस आपल्यापरीने रोजच प्रयत्न करत असतात. पण वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून पोलीस दंड देखील आकारतात. त्यातच आता ई-चलन अस्तित्वात आल्यामुळे वाहनचालकांना वाहतूक पोलीसांकडून ई चलन दिले जाते. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर ई चलन प्रणालीत दंड भरण्याची सक्ती केली जात नाही.

वाहन, वाहनाची कागदपत्रे किंवा परवाने जप्त केली जात नसल्यामुळे दंड भरण्याबाबत वाहनचालक कधीच गंभीर नसतात. परिणामी, ही प्रणाली लागू झाल्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चलन पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आता थकविलेले ई – चलन भरण्यासाठी आणखी १० दिवसांची म्हणजे ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत दंड न भरल्यास वाहन चालकांना आता थेट अटक होणार आहे.

एखाद्या वाहन चालकांनी येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत दंड न भरल्यास त्याला थेट नोटीस पाठवली जाणार आहे. तसेच सुनावणीवेळी हजर न राहिल्यास त्यांना वॉरंट काढून अटक करण्यात येईल. तसेच दंडाबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असेही सहपोलीस आयुक्त यांनी सांगितले आहे.

ज्या वाहनांवर गेल्या आठवड्यात पाच हजार रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचा दंड भरणे बाकी होते, अशा वाहन मालकांच्या मोबाइलवर पोलिसांनी मेसेज पाठवले असून त्या वाहनचालकांनी जर दंड भरला नाहीतर प्रकरण न्यायालयात नेले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच प्रकरण न्यायालयात गेल्यास संबंधित प्रकरणात किती दंड वसूल करावा किंवा मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार काय शिक्षा करावी हा निर्णय न्यायालयाद्वारे घेतला जाणार आहे.

Leave a Comment