कार शौकिन मुलाचा कॅन्सरमुळे मृत्यु, स्पोर्ट्स कारच्या ताफ्यानिशी अंत्ययात्रा


वॉशिंग्टन : मिसौरीचा रहिवासी असलेला १४ वर्षीय मुलगा अॅलेक इनग्राम याला स्पोर्ट्स कार खूप आवडत. त्याचा गेल्या आठवड्यात कॅन्सरमुळे मृत्यू झाला. त्याची स्पोर्ट्स कारच्या ताफ्यासह अंत्ययात्रा काढली जावी, अशी अंतिम इच्छा होती. तो आपले विचार नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करायचा. त्याची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘सिडनीज सोल्जर्स ऑलवेज’ नावाच्या संघटनेने त्याला मदत केली.

तब्बल २१०० पेक्षा अधिक स्पोर्ट्स कार आणि ७० मोटारसायकलींचे मालक अंत्ययात्रेच्या वेळी ताफा घेऊन आले आणि सिक्स फ्लॅग्ज सेंट लुईस पार्किंगमध्ये एकत्र जमले. कॅलिफोर्निया, इंडियाना, मिशिगन, फ्लोरिडा आणि न्यूयॉर्कसह देशभरातून स्पोर्ट्स कारचे बहुतेक मालक स्वत: कार चालवत आले, तर काहींनी चालकास पाठवले होते. अॅलेकला कुणीही ओळखत नव्हते. वाहनांचा ताफा जाण्यासाठी मिसौरी शहरातील वाहतूक दोन तास बंद ठेवण्यात आली होती.

यासंदर्भातील वृत्त सीएनएनने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘स्पोर्ट्स कार्स फॉर एलेक’चे आयोजन करण्यात आले होते. सिडनीज सोल्जर्स ऑलवेज नावाच्या संघटनेचे प्रमुख दाना क्रिश्चियन मॅनली यांनी यासाठी कारची व्यवस्था केली होती.

मॅनली यांची ८ वर्षांची मुलगी सिडनी हिचा देखील कॅन्सरने मृत्यू झाला होता. आमच्या संपर्कात जितके कॅन्सर पीडित आहेत, ते सारे एखाद्या कुटुंबाप्रमाणे राहतात, मदत करतात. आमच्याकडे टर्मिनल आजाराच्या मुलांची यादी आहे, त्यामुळे एलेकच्या घरी गेलो होतो आणि त्याची इच्छा काय आहे हे आईला विचारले होते. त्यानंतर देशभरातील लोक कार घेऊन मिसौरी येथे आले होते.

या साऱ्या अनुभवाने अॅलेकची आई जेनी इनग्राम अतिशय भावुक झाली. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले, माझा लाडका मुलगा केवळ १४ वर्षे आमच्यासोबत राहिला. थोडे दिवस का नाही, पण अॅलेकचे आम्ही माता-पिता व्हावेत म्हणूनच आमची निवड केली असावी. त्याच्याशिवाय आता जगणे अधुरे आहे, त्याची सतत उणीव भासत असते. २०१५ मध्ये अॅलेकला ओस्टियोसारकोमा झाल्याचे लक्षात आले. हाडाचा कॅन्सर एक दुर्मिळ प्रकार असतो. चार वर्षे कॅन्सरशी झुंज देऊन त्याने आमचा कायमचा निरोप घेतला.

Leave a Comment