मुंबई महानगरपालिकेला खड्डे दाखवून या पठ्ठ्याने केली बक्कळ कमाई


मुंबई : बृह्नमुंबई महानगरपालिकेला खड्डे दाखवत मुंबईतील एका जागरुक तरुणाने बक्कळ कमाई केली आहे. एका पठ्ठ्याने बृह्नमुंबई महानगरपालिकेला खड्डे दाखवून तब्बल 5 हजार रुपयांचे बक्षीस मिळवले आहे. या तरुणाचे नाव प्रथमेश चव्हाण असे असून दादरमधील शिवाजी पार्क परिसरातील तो रहिवाशी आहे. प्रथमेशने महापालिकेच्या खड्डे दाखवा आणि 500 रुपये मिळवा या मोहिमेअंतर्गत, सर्वाधिक 50 तक्रारी दाखल केल्या होत्या.

महापालिकेच्या नियमांनुसार, खड्ड्याची तक्रार दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आत ते खड्डे बुजवणे आवश्यक होते. अन्यथा तक्रारदाराला 500 रुपये बक्षीस द्यावे लागणार होते. महापालिकेने 24 तासाच्या आत प्रथमेशने दाखवलेले 10 खड्डे बुजवले. पण अन्य खड्डे बुजवता न आल्यामुळे त्याला 5 हजार रुपयांचे बक्षीस महापालिकेला द्यावे लागले.

मुंबई महानगरपालिकेने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात खड्डे दाखवा आणि 500 रुपयांचं बक्षीस मिळवा ही मोहीम राबवली होती. खड्डे दाखवल्यानंतर ते 24 तासांच्या आत बुजवावे लागणार होते, अन्यथा अधिकाऱ्यांच्या आणि कंत्राटदारांच्या खिशातून बक्षीसाची रक्कम दिली जाणार होती. मुंबई महापालिकेकडे या मोहिमेदरम्यान जवळपास दीड हजाराहून अधिक तक्रारी दाखल झाल्या. तक्रारदारांनी दाखवलेले बहुतेक खड्डे 24 तासांच्या आत बुजवण्यात आले. पण पालिकेला काही खड्डे 24 तासांच्या आत बुजवणे न जमल्यामुळे 155 जणांना बक्षीस द्यावे लागले.

केवळ दोनच तक्रारी एक व्यक्ती करु शकेल अशी अट महापालिकेची होती. पण त्याला आव्हान देत प्रथमेशने 50 तक्रारी दाखल केल्या. त्याने केलेल्या तक्रारीनंतर बहुतेक खड्डे बुजवण्यात आले. पण 10 खड्डे बुजवू न शकल्यामुळे महापालिकेला प्रथमेशला 5 हजार रुपये द्यावे लागले. प्रथमेशने आजपर्यंत ‘मायबीएमसी पॉटहोल फिक्सीट’ या अ‍ॅपवरुन जवळपास 70 तक्रारी केल्या आहेत.

Leave a Comment