आता जानेवारीत होणार मराठा आरक्षणावरील सुनावणी


नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणावर होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. ही याचिका उच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरुद्ध दाखल करण्यात आली होती. मंगळवारी त्यावर सुनावणी होणे अपेक्षित होते. पण या प्रकरणाची सुनावणी जानेवारी महिन्यात घेणार असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मराठा समाजाच्या मागण्या लक्षात घेता राज्य सरकारने 16 टक्के आरक्षणाचा कायदा आणला. पण, उच्च न्यायालयाने तो वैध ठरवतानाच त्याची टक्केवारी कमी करून 12-13 टक्के केली. 27 जूनला आलेल्या उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

मराठा आरक्षणासंदर्भात आलेल्या सर्वच याचिका एकत्रित करण्याचे निर्देश नवनियुक्त सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी दिले. तसेच आता 22 जानेवारी रोजी त्यावर सुनावणी होणार असे जाहीर केले. मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले, तरी घाबरण्याचे काहीच कारण नाही. मराठा आरक्षणावर याचा काहीच परिणाम होणार नाही असा दावा आरक्षण आंदोलनातील नेते विनोद पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना केला आहे.

Leave a Comment