सत्तास्थापनेसाठी रामदास आठवलेंचा नवा फॉर्म्युला


नवी दिल्ली- अजूनही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात युती होईल, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे(आरपीआय) प्रमुख रामदास आठवले यांनी व्यक्त केली असून एका वृत्तसंस्थेशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, भाजपसोबत चर्चेमध्ये झालेल्या तडजोडीबाबत आपण शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी बोलणे केले आहे.

रामदास आठवले पुढे बोलताना म्हणाले की, संजय राऊत यांच्याशी मी तडजोडीबद्दल बोललो होतो. त्यांना 2-3 वर्षांचा फार्म्युला मी सुचवला आहे. यात 3 वर्षे भाजपचा मुख्यमंत्री आणि 2 वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री. पुढे ते म्हणाले की, भाजप या फॉर्म्युल्यावर जर ठाम असेल, तर आपल्या पक्षासोबत संजय राऊत चर्चा करायला तयार आहेत.

रामदास आठवले यापूर्वी म्हणाले होते की, महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय पेचप्रसंगाची चिंता न करण्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना सांगितले आहे. तसेच, भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन सरकार स्थापन करतील, असा विश्वासही त्यांनी दिला. तसेच, अमित भाईंना मी सांगितले की, त्यांनी जर मध्यस्थी केली तर एखादा मार्ग नक्की सापडेल.

Leave a Comment