महाराष्ट्रातूनच सुरू होणार भाजपच्या अंताची सुरूवात : संजय राऊत


मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही कायम असून त्यातच राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. एकीकडे सत्तास्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी पुढाकार घेतला असला तरी सत्तास्थापनेचा पेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे अद्यापही सुटल्याचे दिसत नाही. अशातच राज्यात शिवसेनाच सरकार स्थापन करेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त करत महाराष्ट्रातूनच भाजपच्या अंताची सुरूवात होणार असल्याचा घणाघात केला.

शिवसेनेच्या मनात सत्तास्थापनेचा गोंधळ नाही. केवळ माध्यमांच्या तो मनात असल्याचे म्हणत राऊत यांनी माध्यमांवरही टीका केली. युती २०१४ मध्ये तुटल्यानंतर युतीत जायची आम्हाला इच्छा नव्हती. भाजपने त्यांचा सर्वात मोठा मित्रपक्ष गमावला आहे. महाराष्ट्रातूनच भाजपच्या अंताची सुरूवात होणार आहे. भाजपला याची मोठी किंमत येत्या काळात चुकवावी लागेल. लवकरच राज्यात सरकार स्थापन होईल आणि शिवसेनाच त्याचे नेतृत्व करेल. शिवसेनेच्या नेतृत्वाखालीच स्थिर सरकार स्थापन होईल आणि यासाठी कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. विधीमंडळात आम्ही बहुमत सिद्ध करताना १७० जणांचा पाठिंबा दाखवून देऊ. सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती शासन हे लागू झाले आहे. राज्यात ते संपण्यापूर्वी सरकार स्थापन होईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सामनातील संपादकीयचाही यावेळी त्यांनी उल्लेख केला. संपादकीय मधून आम्ही सत्य मांडले आहे. शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपला उभे करण्याचे काम केल्याचा उल्लेखही राऊत यांनी यावेळी केली. शिवसनेकडून सामनाच्या संपादकीय मधून आम्हाला एनडीएतून बाहेर काढणारे तुम्ही कोण? असा सवाल केला आहे. ‘एनडीए’ची स्थापना केली त्यांनाच घराबाहेर काढण्याची हीन व नीच घोषणा या मंडळींनी केली. साधी चर्चा नाही, चिठ्ठीचपाटी नाही. ज्या ‘एनडीए’चे अस्तित्वच मागच्या साडेपाच वर्षांत पद्धतशीरपणे नष्ट केले त्या ‘एनडीए’तून म्हणे शिवसेनेस बाहेर काढले. ही अहंकारी आणि मनमानी राजकारणाच्या अंताची सुरुवात आहे. हिंमत असेल तर या अंगावर. आम्ही तयार असल्याचे म्हणत शिवसेनेने भाजपवर तोफ डागली आहे.

Leave a Comment