पार्किंगचे नियमभंग करणाऱ्याचे फोटो काढा आणि बक्षीस मिळवा


पुणे – सिम्बायोसिस कौशल्य आणि मुक्त विद्यापीठातर्फे ‘लॉजिस्टिक, ट्रान्सपोर्टेशन आणि एमएसएमई क्षेत्रातील संधी’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी देशभरात पार्किंगची समस्या गंभीर झाली असून आगामी काळात रस्त्यावर नियम मोडून वाहन पार्क केल्याचे फोटो काढून निदर्शनास आणणाऱ्या व्यक्तीला, नियमभंग करणाऱ्या व्यक्तीकडून जो दंड वसूल केला जाईल, त्यातील २० टक्के रक्कम फोटो काढणाऱ्या व्यक्तीला बक्षीस म्हणून देण्यात येणार असून लवकरच त्या बाबतचा कायदा अमलात येईल, असे सूतोवाच केले.

गडकरी म्हणाले, की पार्किंगसाठी आजकाल जागा मिळत नाही. माझ्या दिल्लीतील कार्यालयाच्या बाहेर पार्किंगसाठी जागा नसल्याने ही समस्या सोडवण्यासाठी ईझी पार्क ही तंत्रसुसज्ज पार्किंग इमारत उभारण्यात आली. आता मोठय़ा शहरांमध्ये एनएचआयडीसीच्या माध्यमातून अशा ५० पेक्षा अधिक इमारती उभारण्यात येत आहेत. त्याचा व्यावसायिक वापरही होईल. बसस्थानकांमध्ये उपलब्ध असलेल्या जागेचा वापर करून तेथे ‘बस पोर्ट’ उभारण्यात येईल. बस पोर्टला दळणवळण सोयींनी जोडले जाईल.

Leave a Comment