जगातील काही क्रूर तानाशाह


आपल्या जगाच्या इतिहासामध्ये असे अनेक शासक, राज्यकर्ते होऊन गेले, ज्यांची जगावर हुकुमत करण्याची महत्वाकांक्षा इतकी मोठी होती की त्यापायी लाखो प्राणांच्या आहुती देण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. ह्या राज्यकर्त्यांपैकी काही, स्वतः अतिशय कसलेले योद्धे होते. त्या पराक्रमी वीरांच्या तलवारीच्या सामर्थ्यापुढे उभे राहण्याची ताकद कोणाचीच नव्हती. त्याचप्रमाणे काही तानाशाह असे होऊन गेले ज्यांनी त्यांच्या सैन्याच्या जोरावर सत्ता काबीज केल्या. सत्तेपायी लाखो लोकांची कत्तल करविली. असे हे तानाशाह आणि क्रूर राज्यकर्ते इतिहासामध्ये अमर झाले ते त्यांच्या क्रौर्याच्या कहाण्यांमुळे.

चंगेझ खान : चंगेझ खान मंगोलियातील महान योद्ध होता. आपल्या तलवारीच्या बळावर त्याने जवळजवळ अवघा आशिया प्रांत काबीज केला. भारतावर देखील कब्जा करण्याचा चंगेझ खानचा मानस होता. पण दिल्ली चे सुलतान इल्तुत्मिष यांनी चंगेझ खानाला नमविले, आणि चंगेझ खानाला परतावे लागले. चंगेझ खानाने आपल्या आयुष्यभारत जेवढ्या लढाया केल्या, त्या सर्व लढायांमध्ये त्याने लाखोंची कत्तल केली. अतिशय निर्दय असा हा राज्यकर्ता होता, ज्याच्या क्रूरपणापुढे झुकत अनेक राज्यकर्त्यांनी त्याच्यापुढे आपण होऊन आपली हार मान्य करीत आपला मुलुख त्याच्या हवाली केला.

गायस सीझर : हा रोमचा शासक होता. त्याने आपण देव असल्याचे घोषित केले आणि सर्वांनी त्याचा हुकुम मानवा असा आग्रह धरला. ज्यांनी त्याच्या हुकुमाविरुद्ध जायचे धाडस केले त्यांना गायस ने यमसदनी धाडले. त्याच्या अधिपत्याखाली रोमचा पुष्कळ विकास जरी झाला तरी सीझरच्या कडक नियमांच्या खाली त्याची रयत दबून गेली होती. त्याने घालून दिलेल्या नियमांच्या विरुद्ध वागणाऱ्यांना तो सरळ वाघ-सिंहांच्या तोंडी देत असे. त्याचे अधिपत्य केवळ चारच वर्षांचे होते तरी या चार वर्षात हजारो लोकांना सीझरच्या क्रौर्यापायी आपले प्राण गमवावे लागले.

इवान द टेरिबल : १६व्या शतकामध्ये रशियामध्ये रूरीकोविच वंशाचे साम्राज्य होते. त्याच वंशाचा हा झार. त्याच्या क्रूरपणामुळे त्याला सर्व ‘इवान द टेरिबल’ म्हणून ओळखत असत. इवान अगदी लहान असतानाच त्याच्या पित्याचा मृत्यू झाला त्यामुळे त्याला योग्य मार्गदर्शन करणारे जवळचे असे कोणी नव्हते, पण कळता झाल्यानंतर इवानने एक एक करून त्याच्या विरोधकांना संपवावयास सुरुवात केली. याच्या क्रौर्याची झळ सगळ्यांनाच लागली. मॉस्को शहर इवानच्या अधिपत्याखाली असताना अनेक वेळा भस्मसात झाले. इवान इतका क्रूर होता की त्याने स्वतःच्या मुलालाद्खील मारून टाकले.

रोबस्पियर : अठराव्या शतकामध्ये फ्रांस मध्ये क्रांती झाली. त्यावेळी रोबस्पियरने संपूर्ण देशामधून त्याचे विरोधक पकडवून आणून त्यांच्या सामुहिक हत्या करविल्या. रणभूमीमध्ये स्वतः हत्यारे घेऊन तो लढत असे. त्याच्या तानाशाहीखाली जनता अगदी भरडून निघाली होती. रोबस्पियरचा आतंक इतका भयानक होता की त्याचाच परिणाम म्हणून की काय, पण तो जेव्हा सत्तेवरून हटविला गेला तेव्हा त्याचा शिरच्छेद करण्यात आला.