जगातील काही विचित्र आविष्कार


मनुष्याची तंत्रज्ञानाशी जसजशी ओळख होत गेली तसे, आपले जीवन अजून सोपे, आरामदायी कसे होईल त्या दृष्टीने मनुष्याने निरनिराळे शोध लावण्यास सुरुवात केली. गरज ही शोधाची जननी असते असे म्हणतात, पण जगातील काही शोध असे लावले गेले ज्यांच्या मुळे सर्वांचीच चांगली करमणूक झाली. असे कुठले शोध होते ते पाहूया..

१९६० च्या दशकामध्ये जेव्हा उंदीरांचा प्रादुर्भाव वाढीला लागला तेव्हा त्यांना पळविण्यासाठी एका अजब यंत्राचा शोध लावण्यात आला. उंदीरांना पळविण्यासाठी असे एक मशीन तयार करण्यात आले जे एका मिनिटामध्ये दहा वेळा मांजरीचा आवाज काढत असे. मांजरीचा एक मुखवटा या यंत्रावर लावण्यात आला होता. मांजरीचा आवाज निघण्याबरोबरच या मांजरीच्या मुखावट्या वर लावलेले नकली डोळे ही चमकत असत. या शोधाचा उद्देश हा की मांजरीचा आवाज ऐकून आणि डोळे चमकताना पाहून उंदीर पळून जावेत. हा शोध किती यशस्वी झाला असावा याचा अंदाज घेणे कठिण नाही.

बेबी होल्डर : १९३७ साली हॉकीपटू जॅक मायफोर्ड याने या बेबी होल्डर चा शोध लावला. बाळाला बसायला एक होल्डर तयार करून त्या होल्डर ला दोन पट्टे लावाविले. त्यातील एक पट्टा त्याने आपल्या खांद्याभोवती गुंडाळला आणि दुसरा पट्टा त्याच्या पत्नीने तिच्या खांद्याभोवती गुंडाळला. मध्ये तयार झालेल्या, झुल्यासारख्या दिसणाऱ्या पिशवीत त्यांनी आपल्या बाळाला बसविले. ह्या शोधाचा उद्देश हा की बर्फावर स्केटिंग करताना त्यांना आपल्या बाळालाही बरोबर न्यायचे होते, पण स्केटिंग करिता हात ही मोकळे राहणे आवश्यक होते. म्हणून या बेबी होल्डर ची कल्पना मायफोर्डला सुचली.

घुमावदार नळी असलेली रायफल : ह्या रायफलचा शोध १९५३ साली लावला गेला. एखाद्या रायफल मधील नळीतून एकाच दिशेला गोळी डागता येते. पण या रायफल ची नळी घुमावदार असल्याने चारही दिशांना गोळ्या डागता येत असत. फारच कमालीचा शोध होता हा.

सिगरेट पॅक होल्डर : १९५५ साली या होल्डर चा शोध लावला गेला. हा सिगरेट होल्डर म्हणजे एका अर्थी म्रुत्युला आमंत्रणच होते. या मध्ये एकाच नळीला दहा सिगरेट होल्डर लावलेले होते. त्यामुळे धूम्रपान करणाऱ्याला एकाच वेळी एकदम दहा सिगरेट ओढता येत असत. १९५५ साली असे पन्नास सिगरेट होल्डर बनविले गेले होते.

झगमगणारे टायर : १९६१ साली गुडईयर कंपनीने हे टायर बनविले होते. हे टायर सिंथेटिक रबर पासून तयार केले गेले होते. त्यामुळे रात्री अंधारामध्ये हे टायर चमकत असत. त्याचबरोबर या टायर्सच्या रिम मध्ये दिवे ही लावता येत असत. हा शोध त्याकाळी अर्थातच थोडक्या वेळेपुरताच लोकप्रिय झाला.

शॉवरहूड : १९७० साली हे हूड किंवा टोपी अश्या व्यक्तींकरिता बनविले गेले ज्यांना आंघोळ करतानासुद्धा आपला मेकअप टिकून राहावा अशी इच्छा असे. शॉवर खाली उभे राहिल्यानंतर पूर्ण अंगभर जरी पाणी पडत असले तरी या हूडमुळे चेहऱ्यावर पाणी पडत नसल्याने मेकअप पुसला जाण्याची काळजी करावी लागत नसे.

Leave a Comment