म्हणून धूम्रपान सोडणे गरजेचे


धूम्रपान करणे म्हणजे अनेक रोगांना निमंत्रण ही गोष्ट आता सर्वांनाच माहीत झाली आहे पण त्याचा सर्वात मोठा धोका अशक्तता वाढवणे हा असतो आणि त्यासाठी कसलाही विचार न करता व्यसनी लोकांनी तातडीने त्याचा त्याग केला पाहिजे असे मत या विषयावर संशोधन करणार्‍या काही संशोधकांनी व्यक्त केले आहे. धूम्रपानाने दुबळेपणा वाढतो आणि तो विशेषे करून वृद्धावस्थेत वाढत असतो आणि त्याचे दुष्परिणाम या वयात तीव्रतेने जाणवत असतात. ते फार गंभीरही असतात म्हणून वृद्धपणातही ज्यांना अजून धूम्रपान सोडणे शक्य झालेले नसेल त्यांनी ते ताबडतोब सोडले पाहिजे असे केवळ वृद्धपणा आणि त्या अवस्थेतले विकार यांनाच वाहिलेल्या एका नियतकालिकांत प्रतिपादन करण्यात आले आहे.

धूम्रपानाने अशक्तता वाढण्याची शक्यता ६० टक्के एवढी म्हणजे मोठीच असते असे या संशोधनाच्या निष्कर्षात म्हटले आहे. आपल्या शरीराची ही अवस्था आपले शारीरिक दौर्बल्य तर वाढवतेच पण कोणत्याही विकाराला बळी पडण्याविषयीची संवेदनशीलता पराकोटीची करून टाकते. अनेकदा असे आढळते की, वृद्धांमध्ये बाथरूममध्ये घसरून पडणे आणि त्यात पायाच्या किंवा मांडीच्या हाडाचे फ्रॅक्चर होणे आणि नंतर खिळून पडणे असे प्रकार फार घडतात. कित्येक वृद्धांना तर मृत्यूपर्यंत अशा अवस्थेत परावलंबी जीवन जगावे लागते. ही आपत्ती टाळायची असेल तर अशक्तपणा टाळला पाहिजे. त्याचे मुख्य कारण असते धूम्रपान. ते ही सारी संकटे ओळखून ताबडतोब सोडणे आवश्यक असते.

असे परावलंबी जीवन जगावे लागते याचा माणसाच्या मानसिकतेवरही विपरीत परिणाम होत असतो. लंडनच्या गोटॅरो कोजिमा या संशोधकाने या सार्‍या घटकांचा अभ्यास केला आहे. त्यांच्या मते धूम्रपान हे अशा अनेक रोगांचे मूळ आहे की ज्यांचे आपल्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक जगण्यावर अनेक प्रकारे आघात होत असतात. त्यांना हेच दाखवून द्यायचे आहे की, धूम्रपान हे आपल्या आयुष्यावर सर्वंकश परिणाम करीत असते. त्यामुळे सिगारेटचे व्यसन सोडायला मुहूर्त बघण्याची काही गरज नाही. ते कोणत्याही वयात सोडता येते. अगदी वयाची साठी ओलांडल्यानंतरही सिगारेट, विडी असे व्यसन सोडता येते. झाले तर त्याचे चांगलेच परिणाम आपल्या मनावर आणि अंतिमत: शरीरावर होतील अशी ग्वाही या संशोधकांनी दिली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment