मुंबई उच्च न्यायालयात टीक-टॉक’ अॅपवर बंदीसाठी याचिका


मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात याचिका टीक-टॉक या मोबाईल अॅपविरोधात दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील हिना दरवेश या गृहिणीकडून टीक-टॉकवर बंदी आणण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. टीक-टॉकमुळे मुलांवर वाईट संस्कार होतात. या अॅपमध्ये अश्लील व्हिडीओ अधिक असतात. या व्यंगात्मक व्हिडीओजमुळे तरुणाईत आत्महत्यांचे प्रमाणदेखील वाढत आहे. तसेच यात अनेकदा जातीवाचक मुद्यांवरही व्हिडीओ प्रसारित केले जातात, ज्यामुळे देशात जातीयवाद भडकू शकतो, असा तीन मुलांची आई असलेल्या हिना यांचा आरोप आहे.

एका चायनीज कंपनीचे टीक-टॉक हे मोबाईल अॅप्लिकेशन असल्याने यामागे भारताविरोधात छुपा मनसुबाही असू शकतो, अशी शक्यता या याचिकेतून व्यक्त करण्यात आली आहे. देशाची प्रतिमा टीक-टॉकवरील व्हिडीओजमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मलीन होत आहे. देशाच्या विकासावरही ज्याचा एकंदरित परिणाम होत असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. अॅड. अली काशिफ खान यांच्यामार्फत हिना दरवेश यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर लवकरच उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

अनेकदा टीक-टॉक संदर्भात तक्रार करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांकडून या संबंधित दोन गुन्ह्यांची नोंदही करण्यात आली आहे. पण म्हणावी तशी कठोर कारवाई या अॅपविरोधात करण्यात आलेली नाही. टीक-टॉकविरोधात याआधी मद्रास उच्च न्यायालयातही एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. पण यावरील सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला होता.

Leave a Comment