
पुणे – भाजपच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांचे नाव महानगरपालिकेच्या आगामी महापौर पदाच्या उमेदवारीसाठी जाहीर करण्यात आले आहे. महापालिकेतील सध्याचे संख्याबळ पाहता महापौर भाजपचाच होणार हे जवळपास निश्चित असल्याने मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
पुण्याच्या महापौरपदासाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची अधिकृत घोषणा
महापौर पदासाठी भाजपकडून अनेकजण इच्छुक असल्यामुळे भाजपकडून नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार का, याबाबत उत्सुकता असतानाच भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांचे नाव जाहीर झाल्याने अन्य नेत्यांच्या आशा मावळल्या आहेत. यापूर्वी मुरलीधर मोहोळ यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. त्याचबरोबर मोहोळ हे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोथरूड विधानसभा मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मैदानात दंड थोपटून उतरले होते. याचेच बक्षीस मिळाल्याची चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे.
मोहोळ हे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांनी स्वत: कोथरूडमधून आमदारकी लढवण्यासाठी तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांना त्याग करावा लागला. महापालिकेत सध्या भाजपला संपूर्ण बहुमत असून, त्यांचे 97 नगरसेवक आहेत. तर, राष्ट्रवादीकडे 39 नगरसेवक आहेत. तसेच शिवसेना 10, काँग्रेस 9, मनसे 2 आणि इतर 5 नगरसेवक आहेत. भाजपचा महापौर होणार हे निश्चित असतानाही काँग्रेस व राष्ट्रवादीने ही निवड एकतर्फी होऊ न देण्यासाठी आघाडीकडून राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रकाश कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
