शिवसेना पक्षप्रमुखाचा एकेरी उल्लेख करत निलेश राणेंची टीका


मुंबई – रविवारी अनेक राजयकीय पक्षातील नेत्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थावर बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्वपक्षीय नेत्यांनी आदरांजली वाहिली. अनेक दिग्गज नेत्यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. बाळासाहेबांना माजी खासदार निलेश राणे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून आदरांजली वाहिली, पण त्यांनी त्याच वेळी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या दिवशीच उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.


रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करणारे एक ट्विट निलेश राणे यांनी केले. निलेश यांनी आपल्या ट्विटमध्ये, लाखोंच्या मनावर अधिराज्य करणारे शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदयसम्राट मा. श्री. बाळासाहेब ठाकरे साहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन, असे म्हटले होते. त्यानंतर दुपारी सव्वा एकच्या सुमारास निलेश यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनावरुनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत एक ट्विट केले. निलेश राणे आपल्या ट्विटमध्ये बाळासाहेब जाऊन सात वर्ष झाली तरी त्यांचे जगाला दाखवता येईल असे एकही स्मारक बांधता आले नसल्याचे म्हणत बाळासाहेबांचे पुत्र असणाऱ्या उद्धव यांना याबद्दल लाज वाटली पाहिजे असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment