”इनव्हीझिबल” … जगामध्ये सर्वात महाग हेअरकट


साडेसहा हजार रुपये किमतीचा हेअरकट असू शकतो अशी नुसती कल्पना करणेही किती अवघड आहे.. पण ही कल्पना प्रत्यक्षात उतरविली आहे रोसानो फेरेती या जगामधील सर्वात महाग म्हणून ओळखल्या जाणऱ्या हेअरड्रेसरने. रोसानो आपल्या या विशिष्ट हेअरकट साठी जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. या हेअरकटला “ इनव्हीझिबल हेअरकट “ या नावाने ओळखले जाते. एका विशिष्ट पद्धतीने केस न कापता हेअरकट घेणाऱ्या व्यक्तीच्या केसांची नैसर्गिक वळणे लक्षात घेऊन हा हेअरकट दिला जातो. प्रत्येक व्यक्तीच्या केसांना वेगळे वळण असल्याने, ते लक्षात घेऊनच हा हेअरकट दिला जातो. रोसानो या कामामध्ये निष्णात असून, केट मिडल्टन, लेडी गागा, जेनिफर लॉरेन्स यांसारखी प्रसिद्ध व्यक्तिमत्वे रोसानोकडून आपले केस कापवून घेणे पसंत करतात. नुकताच रोसानो याने नवी दिल्लीध्ये आपला हेअर स्पा , “ रोसानो फेरेती हेअर स्पा “ या नावाने उघडला आहे.

केशकर्तनामधील आपल्या नैपुण्याबद्दल बोलताना रोसानो म्हणतात की केस कापण्याच्या ज्या पद्धती पूर्वी वापरल्या जात असत, त्याबद्दल ते असमाधानी होते. त्यामुळे त्यांनी जगभर प्रवास करून नवनवीन पद्धती शिकण्याचे ठरविले. जगभर फिरत असताना एक गोष्ट त्यांच्या प्रकर्षाने लक्षात आली, ती म्हणजे कितीही महाग पार्लर मध्ये जाऊन केस कापवून घेतले तरी त्याबद्दल महिला समाधानी दिसत नसत. त्यामुळे प्रत्येक महिलेच्या किंवा तरुणीच्या केसांचा नैसर्गिक पोत आणि वळणे लक्षात घेऊनच हेअरकट दिला जाणे आवश्यक आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यातून जन्म झाला “इनव्हीझिबल हेअरकट”चा. प्रत्येक महिलेच्या केसांची नैसर्गिक वळणे लक्षात घेऊन त्यानुसारच हा हेअरकट दिला जात असल्याने हा ‘कस्टमाइज्ड’, म्हणजेच त्या व्यक्तीकरिता खास तयार केलेला हेअरकट आहे असे रोसानो सांगतात.

रोसानो फेरेती यांच्या भारतामधील सर्व हेअर स्पांमध्ये हा हेअरकट करून घेता येतो. रोसानो यांच्याकडून प्रशिक्षण घेऊन आलेले हेअर स्टायलिस्ट्स या स्पांमध्ये उपलब्ध आहेत. भारतामध्ये रोसानो यांच्या स्पा मध्ये इनव्हीझिबल हेअरकट करवून घ्यायचा झाल्यास ग्राहकाला तब्बल साडे सहा हजार रुपये इतकी किंमत मोजावी लागते. रोसानो यांच्याकडे हॉलीवूड बरोबरच बॉलीवूड मधील तारका ही येत असतात. पण आपल्या दृष्टीने सर्वच ग्राहक सेलिब्रिटी असल्याचे रोसानो म्हणतात.

Leave a Comment