‘हे’ स्मार्टफोन अ‍ॅप करणार मानसिक आजारावर उपचार


वॉशिंग्टन : सध्याच्या धावपळीच्या गुंतागुंतीच्या काळात आपली जीवनशैलीच बदली असल्यामुळे आपल्यावरचा ताण अधिक वाढला आहे. अनेक मानसिक आजारांचे प्रमाण ताण-तणाव व बदलते जीवनमान यामुळे वाढत आहे. अनेकदा त्या आजाराचे निदान लवकर होत नाही किंवा त्याबद्दलची कल्पना देखील येत नाही. म्हणून शास्त्रज्ञांनी मध्यम आणि वृद्ध प्रौढांमधील मानसिक आजाराला नियंत्रित ठेवण्यासाठी एक स्मार्टफोन अ‍ॅप तयार केले आहे.

तीन महिन्यांच्या कालावधीत रुग्णांना १० सत्रांमध्ये त्यांच्यामधील तणाव, आजार, औषधे वेळेवर घेणे व त्याबाबतचे धोरण आणि औषधांच्या दुरुपयोगाबद्दल माहिती या अ‍ॅपमध्ये देण्यात येते. डॉक्टर या अ‍ॅपच्या वापराची माहिती ठेवू शकतात व काही अडचणी आल्यास रुग्णांना मदत करू शकतात. तसंच दूरवरच्या भागात असलेल्या रुग्णांना टेलेमेडिसिनच्या माध्यमातून मदत करू शकतात.

या अ‍ॅपची चाचणी अमेरिकेतील डार्थमाऊथ यूनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी केली. गंभीर मानसिक आजार असलेल्या दहा जणांना या चाचणीत सहभागी केले होते. चाचणीत असे दिसून आले की हे अ‍ॅप अतिशय उपयोगी आहे आणि त्याच्या वापराने अनेकजण समाधानी आहेत. तंत्रज्ञानाबाबत कमी माहिती असणारे रुग्णदेखील हे अ‍ॅप सहज वापरू शकतात, असे या अभ्यासात आढळून आले.

अशा प्रकारच्या उपचाराचा फायदा गंभीर मानसिक आजार असणाऱ्या रुग्णांना होत असून ते याचा स्वीकार करीत असल्याचे डार्थमाऊथ यूनिव्हर्सिटीचे करेन फोर्टुना यांनी सांगितले. या तंत्रज्ञानामध्ये पारंपरिक मानसोपचाराच्या तुलनेत अधिक फायदे आहेत. अ‍ॅपमधून रुग्णांची वैयक्तिक, प्रतिबंधात्मक काळजी घेण्यास मदत होत असल्याचे फोर्टुना यांनी सांगितले. हा अभ्यास अमेरिकन जर्नल ऑफ गेरियाट्रिक सायकियास्ट्री या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment